मिशन अमृत सरोवर : महाराष्ट्रासह विविध राज्यांत भारतीय सैन्याने केले सरोवरांचे पुनरुज्जीवन

मिशन अमृत सरोवर : महाराष्ट्रासह विविध राज्यांत भारतीय सैन्याने केले सरोवरांचे पुनरुज्जीवन

नवी दिल्ली – दक्षिण भारतातील विविध शहरे आणि गावांमध्ये सरोवरांचे पुनरुज्जीवन आणि त्यांचा विकास करण्यासाठी येथील राज्यांमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्याने पुढाकार घेतला आहे. ‘मिशन अमृत सरोवर’संकल्पने अंतर्गत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, केरळ आणि राजस्थानातील विविध भागांमध्ये 75 सरोवरांचे पुनरुज्जीवन आणि विकास करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली.

राष्ट्र उभारणीत योगदान देणे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लष्कर दिवस 2023च्या निमित्ताने, भारतीय सैन्याने हा उपक्रम हाती घेतला होता. भावी पिढ्यांसाठी पाण्याची साठवण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 24 एप्रिल 2022 रोजी मिशन अमृत सरोवरचा शुभारंभ केला होता. याच अंतर्गत, दक्षिण विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी 75 ठिकाणे निवडली. नागरी प्रशासन आणि ग्रामपंचायती यांच्या संयुक्त सहाय्याने लष्कराचे अभियंता आणि सार्वजनिक बांधकाम विभागांच्या माध्यमातून या उपक्रमाचे काम सुरू आहे. या अमृत सरोवरांच्या निर्मितीत पर्यावरणीय घटक लक्षात घेतले आहेत. त्यामुळे ते जलसंचय योजनेचा एक भाग बनतील. पर्यायाने गावातील जलसंकट दूर करण्यात मोठी मदत होईल.


भारतीय सैन्याने या उपक्रमाद्वारे संपूर्ण जनसमुदायाला सामील करून घेत, त्यांना हा उपक्रम पुढे नेण्यासाठी प्रेरित करत, “जल है तो जीवन है” या संदेशाचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे. सरोवरांचे पुनरुज्जीवन आणि विकास करण्याची ही सतत चालणारी प्रक्रिया असून ती खेड्यांमधील आणि देशातील दुर्गम भागातील जीवनमान सुधारण्यास मदत करेल.

पुण्यात, खडकी आणि दिघी भागातील चार ठिकाणे निवडली आहेत. तिथे पुनरुज्जीवन आणि विकासाचे काम सुरू आहे. बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुपच्या अभियंत्यांनी सध्याच्या सरोवरांची साफसफाई, रुंदीकरण आणि खोली वाढवण्यासाठी त्यांच्या मोठ्या संयत्र संसाधनांचा वापर करून हे काम हाती घेतले आहे.

First Published on: January 10, 2023 9:56 PM
Exit mobile version