गुजरात नैसर्गिक आपत्तीत असतानाच कटकारस्थाने सुरू झाली, मोदींची विरोधकांवर टीका

गुजरात नैसर्गिक आपत्तीत असतानाच कटकारस्थाने सुरू झाली, मोदींची विरोधकांवर टीका

नवी दिल्ली : गुजरात नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असतानाच कटकारस्थाने सुरू झाली. गुजरातची देशात आणि जगात बदनामी करण्यासाठी, येथील गुंतवणूक रोखण्यासाठी एकापाठोपाठ एक कारस्थाने रचली गेली, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला.

पंतप्रधान मोदी यांनी आज भुजमध्ये सुमारे 4400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. तत्पूर्वी, त्यांनी भुज जिल्ह्यातील स्मृती वन स्मारकाचं उद्घाटनही केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, खासदार सी. आर. पाटील आणि विनोद एल. चावडा, गुजरात विधानसभेच्या अध्यक्ष डॉ. निमाबेन आचार्य, गुजरातचे राज्यमंत्री किरीटसिंह वाघेला आणि जितूभाई चौधरी उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य कसे ठरले हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या कायद्यापासून प्रेरणा घेत पुढे संपूर्ण देशासाठी असा कायदा करण्यात आला. महामारीच्या काळातही या कायद्याने देशातील प्रत्येक सरकारला मदत केली, असे सांगून ते म्हणाले. गुजरातची बदनामी करण्याच्या सर्व प्रयत्नांकडे दुर्लक्ष करून गुजरातने नव्या औद्योगिक मार्गावरून वाटचाल सुरू केली.

पंतप्रधानांनी यावेळी 2001च्या विनाशकारी भूकंपाच्या संध्येचही स्मरण केलं. ते म्हणाले, मला आठवते जेव्हा भूकंप झाला, तेव्हा दुसऱ्याच दिवशी मी स्वतः येथे पोहोचलो. मी तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो, पक्षाचा साधा कार्यकर्ता होतो. मला माहीत नव्हते की, मी कशी आणि किती लोकांना मदत करू शकेन. मात्र मी ठरवलं की, दु:खाच्या या प्रसंगात मी तुम्हा सर्वांसोबतच असेन आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा सेवेच्या या अनुभवाने मला खूप मदत केली, असे मुख्यमंत्री म्हणाले.

2047पर्यंत भारत विकसित देश
जेव्हा मी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून म्हणतो की भारत 2047पर्यंत विकसित देश बनलेला असेल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, मृत्यू आणि आपत्तीच्या त्या तांडवात आम्ही केलेले संकल्प जसे आज वास्तवात उतरले आहेत, त्याचप्रमाणे आज आपण जो संकल्प केला आहे, तो 2047मध्ये नक्कीच साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

First Published on: August 28, 2022 7:32 PM
Exit mobile version