केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळी गिफ्ट

केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळी गिफ्ट

pm narendra modi

दिवाळीपूर्वी मोदी सरकारने केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळी गिफ्ट दिले आहे. केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्याची घोषणा सरकारने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला. आता केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. यापूर्वी त्यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत होता. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 6२ लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे सरकारवर 16 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

मंत्रिमंडळातील बैठकीत झालेल्या या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाढवलेला महागाई भत्ता हा जुलै 2019 पासून पूर्वलक्ष्यीप्रमाणे दिला जाणार आहे. गेल्या एका वर्षात केंद्रीय सरकारने दुसर्‍यांदा महागाई भत्त्यात वाढ केली आहे. मोदी सरकारे आपल्या पहिल्या कार्यकाळात शेवटच्या काही महिन्यांमध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मिळणारा महागाई भत्ता 12 टक्के केला होता. त्यापूर्वी महागाई भत्ता हा 9 टक्के मिळायचा. सरकारच्या या निर्णयानंतर सरकारी तिजोरीवर 9,168.12 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल, अशी माहिती तेव्हा सरकारने दिली होती.

शेतकर्‍यांसाठीही महत्त्वपूर्ण निर्णय
मंत्रिमंडळात शेतकर्‍यांसाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आता शेतकरी येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत किसान सन्मान निधीसाठी त्यांचे आधार क्रमांक पाठवू शकतात. पूर्वी याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2019 होती. या निधीअंतर्गत सरकार लहान शेतकर्‍यांना दर वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. आयुष्मान भारतअंतर्गत 31 लाखांपेक्षा जास्त लोकांना फायदा झाला आहे. तर 3.5 लाखांपेक्षा जास्त कुटुंबाने कार्ड बनवले आहेत, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी यावेळी दिली. केंद्र सरकारची ही योजना पश्चिम बंगाल आणि दिल्ली वगळता इतर सर्व राज्यांमध्ये लागू आहे.

दोन महिन्याचा पगार एकत्र

केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली असताना राज्य सरकारी कर्मचार्‍यांनाही आता दिवाळीची भेट मिळणार आहे. दिवाळीनिमित्त राज्य सरकारी कर्मचार्‍यांरी आणि निवृत्ती वेतनधारक यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे वेतन अथवा पेन्शन एकत्र देण्यात येणार आहे. तसा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

दिवाळी सणाची सुरुवात यावर्षी २५ ऑक्टोबर २०१९ पासून होत आहे. राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारकांचा दिवाळी सणाचा आनंद द्विगणित व्हावा यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे वेतन अथवा निवृत्तीवेतन २४ ऑक्टोबर २०१९ पूर्वी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त आणि अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही त्याचा लाभ होणार आहे.

First Published on: October 10, 2019 5:35 AM
Exit mobile version