या देशात पसरतोय कोरोनापेक्षा घातक आजार

या देशात पसरतोय कोरोनापेक्षा घातक आजार

संपूर्ण जग कोरोना विषाणूने ग्रस्त असताना कझाकस्तानमध्ये आणखी एक साथीचा रोग झपाट्याने पसरला असल्याचा दावा चिनी अधिकाऱ्यांनी केला आहे. सीएनएनच्या अहवालानुसार, चीनी अधिकाऱ्यांनी असा इशारा दिला की कझाकस्तानमध्ये नवीन ‘अज्ञात निमोनिया’ पसरत आहे जो कोरोना विषाणूपेक्षा अधिक प्राणघातक आहे.

अहवालानुसार मध्य आशियाई देश कझाकस्तानमध्ये यावर्षी न्यूमोनियामुळे १७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ‘कझाकस्तानचे आरोग्य विभाग आणि अन्य संस्था संशोधन करत आहेत पण न्यूमोनिया विषाणूची अद्याप ओळख पटलेली नाही,” असं कझाकस्तानमधील चिनी दूतावासाने एका निवेदनात म्हटलं आहे. कझाकस्तानमध्ये जूनच्या मध्यापासून या अज्ञात न्यूमोनियाच्या नवीन घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, काही ठिकाणी एका दिवसात शेकडो नव्या रुग्णांची नोंद केली जात आहे. चिनी दूतावासाच्या म्हणण्यानुसार, या आजाराने १,७७२ लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यातील काही चिनी नागरिक देखील होते. त्यापैकी ६२८ मृत्यू केवळ जून महिन्यातच झाले. कोविड-१९ पेक्षा हा रोग जास्त प्राणघातक आहे, असं चीनच्या दुतावासाने म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त ‘आज तक’ या वृत्त संस्थेने दिलं आहे.

कझाकस्तानची आघाडीची वृ्त एजन्सी, कजिनफॉर्मच्या आकडेवारीचा हवाला देत असं म्हटलं आहे की गेल्या वर्षी जून महिन्याच्या तुलनेत राजधानी नूरसुल्तानमध्ये न्यूमोनियाच्या रुग्णांची संख्या यावर्षी जूनमध्ये दुपटीने वाढली आहे. कजिनफॉर्मच्या माहितीनुसार, नूरसुल्तान हेल्थकेअर विभागाचे प्रमुख म्हणाले की, ‘दररोज २०० हून अधिक लोक रुग्णालयात दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून न्यूमोनियाने ग्रस्त ३०० लोकांना एका दिवसात रुग्णालयात दाखल केलं जात आहे. चिनी दूतावासाने प्रभावित भागातील रहिवाशांना गर्दी असलेल्या सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा, असा इशारा दिला आहे. याशिवाय लोकांना मास्क घाला, प्रत्येक ठिकाण जंतुनाशक करावं आणि वारंवार हात धुण्यास सांगितलं जात आहे. मात्र, कझाकस्तानने चीनचा हा दावा फेटाळला आहे.

 

First Published on: July 10, 2020 11:34 PM
Exit mobile version