भारतीय एसी रेल्वेचे प्रवासी विमानाकडे वळले – सरकारचा दावा

भारतीय एसी रेल्वेचे प्रवासी विमानाकडे वळले – सरकारचा दावा

(फोटो प्रातिनिधिक आहे)

भारतीय प्रवाशांची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या रेल्वेच्या एसी कोच प्रवाशांनी आता रेल्वेकडे पाठ फिरवली आहे. या प्रवाशांनी विमान प्रवासालाच पसंती दिल्याचं केंद्र सरकारनेच जाहीर केलेल्या अहवालामध्ये स्पष्ट झालं आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ओडिशाच्या कटकमधील एका सभेत शासनाचा अहवाल सादर करण्यात आला. त्यामध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे.

१८ ते २० टक्के प्रवाशांचा विमानाने प्रवास

गेल्या तीन वर्षांच्या काळात १८ ते २० टक्क्यांनी एसी रेल्वेचे प्रवासी हवाई वाहतुकीकडे वळले आहेत. एसी रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी चार महिने आधीपासून एसी रेल्वेचे तिकीट बुक करतात. मात्र,तरीही प्रवासाचे तिकीट कन्फर्म होत नाही. अखेर पर्याय नसल्याने हे प्रवासी विमानाने प्रवास करण्याचा मार्ग निवडतात. त्यामुळे रेल्वेच्या एसी कोचने प्रवास करण्यामध्ये मोठी घट झाली आहे.

देशांतर्गत १० कोटी प्रवासी विमानाने करतात प्रवास

गेल्या वर्षभरात देशांतर्गत १० कोटी प्रवाशांनी विमानाने प्रवास केल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. तर येत्या १५ ते २० वर्षांत यामध्ये पाच पटीने वाढ होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात एसी ट्रेनचा प्रवास कमी होऊन विमानप्रवासालाच अधिक प्राधान्य देताना प्रवासी दिसणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनला प्रवासी मिळण्याची मारामारच होणार असल्याची चिन्ह आहेत!

First Published on: May 29, 2018 6:12 AM
Exit mobile version