पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावास सुरुवात; ३ ऑक्टोबरपर्यंत लिलाव

पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावास सुरुवात; ३ ऑक्टोबरपर्यंत लिलाव

केंद्राच्या ‘नमामि गंगे’ प्रकल्पासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने गेल्या एक वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचे प्रदर्शन व ई-लिलावाचे उद्घाटन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज केले. आजपासून ३ ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात पंतप्रधानांना मिळालेल्या शाल, फेटे, जॅकेट यांसह जवळपास २ हजार ७०० स्मृतिचिन्हांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वस्तूंचा ई-लिलाव होणार आहे. यासाठी www.pmmementos.gov.in या संकेतस्थळावर या वस्तूंचा लिलाव सुरु असणार आहे. यावेळी प्रल्हाद पटेल म्हणाले की, आजपासून ३ ऑक्टोबर पर्यंत सकाळी ११ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय येथे ‘स्मृति चिन्ह’ नावाने जवळपास ५०० स्मृति चिन्हांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.

ते पुढे म्हणाले की, ”प्रत्येक आठवड्यात प्रदर्शनात लावण्यात आलेली स्मृति चिन्हे बदलण्यात येतील. भेटवस्तूंमध्ये पेंटिंग्स, स्मृति चिन्हं, मूर्ति, शाल, फेटे, जॅकेट आणि पारंपरिक संगीत वाद्यांचा समावेश आहे. स्मृति चिन्हांच्या खरेदीसाठी कमीत कमी २०० रुपये आणि जास्तीत जास्त २.५ लाख रुपये किंमत ठरवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या प्रयत्नांचे कौतुक करत लोकांना या प्रदर्शनात सहभागी होण्याची विनंती केली आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ई-लिलावाच्या संकेतस्थळाला टॅग करुन ट्विट केले आहे. ज्यामध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की, “जे होत आहे, त्यावर मी नेहमी विश्वास ठेवला आहे. मागील वर्षभरात मला जेवढ्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हं मिळाली त्या सर्वांचा आजपासून ३ ऑक्टोबर पर्यंत लिलाव होईल. दिल्लीतील इंडिया गेट जवळील एनजीएमए या ठिकाणी या स्मृति चिन्हांचे प्रदर्शन भरवण्यात येईल.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी देशाची जीवनरेखा टिकवून ठेवण्याच्या उदात्त कारणासाठी मिळालेल्या सर्व भेटींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मृतिचिन्हांमध्ये ५७६ शाल, ९६४ कपडे, ८८ फेटे आणि विविध जॅकेट्स यांचा समावेश आहे.
प्रल्हाद सिंह पटेल, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री

First Published on: September 14, 2019 4:27 PM
Exit mobile version