शहीद मेजर चित्रेश बिस्ट यांना ‘अलविदा’

शहीद मेजर चित्रेश बिस्ट यांना ‘अलविदा’

सौजन्य - ANI

भारत-पाकिस्तान सीमेजवळ दहशतवाद्यांनी पेरलेली आईडी स्फोटकं निकामी करताना मेजर चित्रेश सिंग बिस्ट हे शहीद झाले. आज (सोमवारी) दुपारी हरिद्वार येथे मेजर चित्रेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चित्रेश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी डेहराडून येथे हजारोंच्या संख्येत लोक जमले होते. ‘भारत माता की जय’,’मेजर चित्रेश अमर रहे’, अशा घोषणा देत जनसमुदायाने साश्रू नयनांनी मेजरना अखेरचा निरोप दिला. त्यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनीही हजेरी लावली. दरम्यान, चित्रेश यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांमध्ये दु:खासोबत आक्रोशही दिसून आला. यावेळी उपस्थित लोकांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ असेही नारे लगावले. हरिद्वार येथील खडखडी या भागातील स्मशानभूमीत शहीद चित्रेश बिस्ट यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बिस्ट यांच्या पुतण्याने त्यांना मुखाग्नी दिला.

७ मार्चला होता शुभविवाह

काल दुपारी भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने शहीद मेजर यांचे पार्थिव डेहरादूनला आणण्यात आले. त्यानंतर सोमवार दुपारपर्यंत त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. मेजर चित्रेश यांनी अलविदा करण्यासाठी आलेल्या लोकांची संख्या इतकी जास्त होती, की त्यामुळे त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरचे ट्रॅफिक वळवण्यात आलं होतं तसंच या रस्त्यावर विशेष सुरक्षाही तैनात करण्यात आली होती. दरम्यान, येत्या ७ मार्चला चित्रेश यांचा शुभविवाह होणार होता. त्यांच्या लग्नाची सगळी तयारी झाली होती. लग्नासाठी हॉटेलही बुक झालं होतं. लोकांना लग्नपत्रिका वाटण्यात आल्या होत्या. मात्र, नियतीला काहीतरी वेगळच मान्य होतं. लग्नासाठी मेजर चित्रेश यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या त्यांच्या परिवाराला त्यांचे पार्थिव पाहावे लागले.

First Published on: February 18, 2019 5:44 PM
Exit mobile version