हे तर षडयंत्र; दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता असताना विरोध का?, सुप्रिया सुळेंचा सवाल

हे तर षडयंत्र; दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता असताना विरोध का?, सुप्रिया सुळेंचा सवाल

भारत हा एक देश आहे. त्यामध्ये अनेक राज्य आहेत. केंद्र सरकारची नाती यामध्ये चांगलीच असली पाहिजेत. राज्या-राज्यांमधील संबंध चांगले असले पाहीजेत. कारण महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकाच विचाराचे पक्ष आहेत. दोन्हीकडे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे. मग दोन्ही राज्यात भाजपची सत्ता असताना विरोध का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता असताना विरोध का?

सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, हे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वेगळ्याचं प्रकारचं षडयंत्र रचलं जात आहे. जे लॉजिकली आपल्याला दिसत नाहीये. दोन्ही ठिकाणी जर भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, तर मग वाद निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. जर काही अडचणी किंवा त्रुटी असतील तर ऐकमेकांना फोन करुन त्या सोडवल्या जाऊ शकतात, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज्यकर्ता अशा प्रकारची गडबड करु शकतो

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दिल्लीमध्ये येऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून या अडचणी दूर केल्या जाऊ शकतात. परंतु ज्या पद्धतीने काल महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्ला झाला, हे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोकांना ही न आवडणारी गोष्ट आहे. एखादं दुसरा राज्यकर्ता अशा प्रकारची गडबड करु शकतो. परंतु कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्व पक्षीय बैठक घ्यायला हवी होती. सगळ्यांनी स्वत:चे राजकीय मतभेद बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र आलं पाहिजे. उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते मिळून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार आहोत. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहोत. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय षडयंत्र रचत आहेत, हे समजत नाहीये. परंतु दोघेही पुढाकार घेत नसल्यामुळे ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. मात्र, ते ज्या पद्धतीने झुकत आहेत, यामध्ये फक्त महाराष्ट्राचं नुकसान आहे, अशीही टीका सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.


हेही वाचा : विनाकारण महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्ला होणं अयोग्य, फडणवीसांचा थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना फोन


 

First Published on: December 7, 2022 7:47 PM
Exit mobile version