‘या’ कारणासाठी नरेंद्र मोदी करताहेत ध्यानधारणा

‘या’ कारणासाठी नरेंद्र मोदी करताहेत ध्यानधारणा

'या' कारणासाठी नरेंद्र मोदी करतायत ध्यानधारणा

रणरणत्या उन्हात निवडणूक प्रचार मोहिम राबविल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या एका गुहेमध्ये ध्यानाला बसले आहेत. या गुहेपर्यंत नरेंद्र मोदी स्वत: २ किलोमीटर पायी चालत गेले. प्रसारमाध्यमांच्या विनंतीवरुन त्यांनी गुहेमधील काही फोटो काढण्याची परवानगी दिली. रविवारी सकाळपर्यंत नरेंद्र मोदी ध्यान धारणा करणार आहेत. दरम्यान यंदाची निवडणूक प्रचार मोहिम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कष्टप्रद ठरल्याची माहिती समोर आली आहे. या मोहिमेअंतर्गत पंतप्रधानांनी तब्बल ५१ दिवस न थांबता प्रचार सभा घेतल्या.

पंतप्रधानांचे ‘ते’ ५१ दिवस

रविवारी १७ व्या लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यातील शेवटचे मतदान पार पडत आहे. लोकसभा निवडणूक प्रचाराची तोफ शांत झाल्याने सर्वच राजकीय नेत्यांनी निःश्वास सोडला आहे. निवडणूकांची घोषणा झाल्यापासून तब्बल तीन महिने रणरणत्या उन्हात कार्यकर्त्यांपासून स्टार प्रचारकांपर्यंत सर्वांचाच घामटा निघाला. यात प्रचार सभा, मोहिमा, रॅलींमध्ये मतदाराला आवाहन करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही मागे नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक मोहिमेदरम्यान तब्बल १.५ लाख किमी.चा हवाई प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधानांनी एकूण १४२ रॅलींना संबोधीत केले. विशेष म्हणजे एकही रॅली रद्द न करता पंतप्रधानांची निवडणूक मोहिम तब्बल ५१ दिवस सुरूच होती, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नुकतीच दिली.

राहुल गांधीही मागे नाहीत…

पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीही निवडणूक प्रचारात मागे नव्हते. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक मोहिमेदरम्यान तब्बल १५३ रॅलींना संबोधीत केले. यामध्ये राहुल गांधी यांनी दरदिवशी तीन रॅलींना संबोधित केले. तसेच संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी १.२५ लाख किमीचा प्रवास केला. अशाप्रकारे तब्बल ५० दिवस राहुल गांधींनी निवडणूक प्रचार मोहिमेत घालवले.

First Published on: May 18, 2019 6:34 PM
Exit mobile version