‘भारताची चांद्रयान २ मोहीम प्रेरणादायी’, नासानं केलं कौतुक!

‘भारताची चांद्रयान २ मोहीम प्रेरणादायी’, नासानं केलं कौतुक!

'चांद्रयान २'

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम असणाऱ्या चांद्रयान-२मधून अपेक्षित असं यश जरी मिळू शकलं नसलं, तरी या मोहिमेसाठी देशभरातून आणि परदेशातून देखील इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर कौतुकाची थाप पडत आहे. जागतिक अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाने इस्रोच्या चांद्रयान २ मोहिमेचं कौतुक केलं आहे. ‘चांद्रयान २ मोहिमेचा तुमचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. अवकाश हे फार कठीण आहे. भविष्यात तुमच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल’, असं नासाने म्हटलं आहे. इस्रोने चांद्रयान २ मोहिमेविषयी केलेल्या ट्वीटला नासाने उत्तर देताना हे कौतुक केलं आहे.

काय झालं यान उतरताना?

शुक्रवारी मध्यरात्री १२.३० ते १.३० च्या दरम्यान चांद्रयान २ चंद्राच्या भूपृष्ठावर उतरणार होतं. त्यासाठी अवघ्या देशाचं लक्ष्य त्या क्षणाकडे लागलं होतं. मात्र, चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटर अंतरावर चांद्रयान असताना इस्रोचा यानाशी संपर्क तुटला. पुढे बराच वेळ प्रयत्न करून देखील हा संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी इस्रोच्या केंद्रावर हजर होते. मात्र, चांद्रयान उतरवण्यात अपयश आल्यानंतर देखील त्यांनी भारतीय शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, पुढचे २ आठवडे महत्त्वाचे असून या दरम्यान नियंत्रण कक्षाशी यानाचा तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे.


वाचा कशी झाली वीणा ट्रोल – संतप्त नेटकऱ्यांनी वीणा मलिकला पोहचवलं चंद्रावर!

वीणा मलिकचं ट्वीट आणि नेटिझन्सचा संताप!

दरम्यान, एकीकडे खुद्द नासानेच इस्रोचं कौतुक केलं असतानाच पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने मात्र भारताच्या प्रयत्नांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. त्यावर नेटिझन्सही तिला ट्रोल करत चांगलंच सुनावलं आहे.

First Published on: September 8, 2019 1:21 PM
Exit mobile version