‘कोविन अ‍ॅप’वर नेजल व्हॅक्सिन उपलब्ध

‘कोविन अ‍ॅप’वर नेजल व्हॅक्सिन उपलब्ध

चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेतलेला नाही त्यांना लस घेण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या बीएफ ७ या नव्या व्हेरियंटपासून बचाव करण्यासाठी नेजल व्हॅक्सिनच्या वापराला परवानगी मिळाली आहे. नाकाद्वारे दिली जाणारी ही लस कोविन अ‍ॅपवर उपलब्ध झाली आहे. ही लस घेण्यासाठी अ‍ॅपवर नोंदणी करावी लागणार असून प्राथमिक माहितीनुसार या लसीसाठी १ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

भारत बायोटेकने तयार केलेल्या या इन्ट्रानेजल व्हॅक्सिन इनकोव्हॅकला गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने परवानगी दिली. कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनच्या लसींचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना ९ महिन्यांनी ही लस बूस्टर म्हणून घेता येईल.

अशी करा नोंदणी
त्यासाठी cowin.gov.in/ या कोविनच्या वेबसाईटवर तुम्हाला जावे लागणार आहे. तुमच्या नावाची नोंदणी असलेल्या मोबाईलवरून लॉग इन करावे लागणार आहे. त्यानंतर व्हॅक्सिन स्लॉट बुक करावा लागणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आधी लसीचे दोन डोस घेतले होते, त्याच पद्धतीने तुम्हाला लसीचा स्लॉट त्याच्या उपलब्धतेनुसार बुक करावा लागणार आहे. बूस्टर घेतल्यानंतर वेबसाईटवरून त्याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करता येणार आहे.

खासगी रुग्णालयात या लसीची किंमत ८०० रुपये आणि हॉस्पिटल चार्ज १५० रुपये असेल, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. तरी याबद्दलची अधिकृत माहिती लवकरच वेबसाईटवर देण्यात येणार आहे.

बूस्टर डोसची किंमत
भारत बायोटेकने एका प्रसिद्धिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार या लसीची किंमत खासगी रुग्णालयात ८०० रुपये असेल. त्यावर ५ टक्के जीएसटी आकारण्यात येईल, तर सरकारी रुग्णालयात या लसीकरिता ३२५ रुपये आकारण्यात येतील.

First Published on: December 28, 2022 5:09 AM
Exit mobile version