‘त्या’ प्रकरणी DGCAची एअर इंडियाला ‘कारणे दाखवा’ नोटीस

‘त्या’ प्रकरणी DGCAची एअर इंडियाला ‘कारणे दाखवा’ नोटीस

एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांच्या गैरवर्तणुकीप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कठोर भूमिका घेतली आहे. विमान कंपनीने वेळेत कोणतीही कारवाई न केल्याने तसेच विमान कंपनीने डीजीसीएने प्रश्न विचारल्यावर या प्रकरणाची माहिती दिली. या कारणास्तव डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये ‘तुमच्यावर कारवाई का करू नये?’ असे DGCA ने एअर इंडियाला म्हटले आहे. (national dgca issues show cause notice to air india over misbehavior of passengers on paris new delhi flight)

डीजीसीएच्या म्हणण्यानुसार, प्रथम घटनेत एका मद्यधुंद प्रवाशाने क्रूचे न ऐकता टॉयलेटमध्ये धुम्रपान केले. तसेच, दुसऱ्या एका घटनेत एका प्रवाशाने रिकाम्या सीटवर आणि वृद्ध महिला सहप्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केली. दोन्ही घटना या 6 डिसेंबर 2022 पॅरिस-नवी दिल्ली विमानामध्ये घडल्या होत्या.

डीजीसीएने एअर इंडियाकडून माहिती मागवली

नियामकाने एका निवेदनात म्हटले आहे की, डीजीसीएने 5 जानेवारी 2023 रोजी झालेल्या घटनेची एअर इंडियाकडून माहिती मागितली होती. त्यापूर्वी कंपनीने कोणतीही माहिती दिली नव्हती. रेग्युलेटरने सांगितले की, कंपनीने 6 जानेवारी रोजी एक ईमेल उत्तर पाठवले आणि त्याच प्रथमदर्शनी पाहिल्यावर असे आढळले की अनियंत्रित प्रवाशांच्या हाताळणीशी संबंधित तरतुदीचे पालन केले गेले नाही.

दरम्यान, नियामकाने असेही म्हटले आहे की, एअरलाइनकडून कारवाई करण्यात हलगर्जीपणा आणि विलंब झाला. महासंचालनालयाने एअर इंडियाच्या संबंधित व्यवस्थापकाला नियामक दायित्वांचे पालन न केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का करू नये, यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करून त्यांना उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली असून त्या आधारे पुढील कार्यवाही केली जाईल.


हेही वाचा – पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून कंत्राटदारांना नवी कामे द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महत्त्वाची सूचना

First Published on: January 9, 2023 9:44 PM
Exit mobile version