केंद्र सरकारने शरद पवारांची दिल्लीतील सुरक्षा काढून घेतली

केंद्र सरकारने शरद पवारांची दिल्लीतील सुरक्षा काढून घेतली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर अनेक राजकीय उलथापालथी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. शरद पवारांना दिल्लीत झेड सुरक्षा व्यवस्था दिली जात होती. यामध्ये दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान तैनात केले होते. मात्र २० जानेवारी म्हणजे सोमवार पासून हे जवान कामावरच आलेले नाहीत. तसेच या जवानांना हटविण्यामागे काय कारण आहे? याचा कोणताही संवाद आमच्याशी साधण्यात आला नाही, असे ६ जनपथ येथील पवार यांच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंना गृह खाते सुरक्षा पुरवित असते. ज्या व्यक्तिंच्या जीविताला धोका उद्भवू शकतो, अशा लोकांना गृह खात्याच्या परवानगीने सुरक्षा दिली जाते. व्यक्तिमत्त्वानुसार याचे निकष देखील ठरलेले असतात. दिल्लीत शरद पवार यांच्यासहीत ४० अतिमहत्त्वाच्या लोकांची सुरक्षा अचानक काढून घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. या लोकांनाही कोणतीही पुर्वकल्पना देण्यात आलेली नाही, असे कळते.

दिल्लीमध्ये ८ फेब्रुवारी रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. काही दिवसांपूर्वी जेएनयू विद्यापीठात झालेल्या आंदोलनानंतर दिल्लीतील वातावरण गरम आहे. काही दिवसांपूर्वीच गांधी परिवाराचीही सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आलेली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ४० व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या ४० लोकांमध्ये महाराष्ट्रातील आणि भाजप वगळून कोण व्यक्ती आहेत, हे अजून कळू शकलेले नाही.

सरकार सूडबुद्धीने वागत आहे. हे सरकार लोकशाहीसाठी घातक असून हे लोक लोकशाहीला मानतच नाहीत. सुरक्षा काढली म्हणून शरद पवार काही घरी बसणार नाहीत, उलट ते जास्त बाहेर पडतील आणि आणखी त्वेषाने काम करतील. – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड 

 

शरद पवारांची सुरक्षा व्यवस्था काढली, हे मला माहीत नाही. पण राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकरची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली होती. तेव्हा सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा किंवा देण्याचा निर्णय सुरक्षा व्यवस्था सल्लागार समिती करत असल्याचे राज्य सरकारने सांगितले होते. माग आता पवारांची सुरक्षा काढल्यानंतर सरकारचा त्यात हात आहे, असा आरोप कसा काय केला जाऊ शकतो. – माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

First Published on: January 24, 2020 9:48 AM
Exit mobile version