आता फुंकरमधून होणार कोरोनाची चाचणी, अवघ्या एका मिनिटांत मिळणार रिपोर्ट!

आता फुंकरमधून होणार कोरोनाची चाचणी, अवघ्या एका मिनिटांत मिळणार रिपोर्ट!

कोरोना टेस्टिंग किट

जगभरात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक हजारोंच्या संख्येने वाढत असताना कोरोनाच्या टेस्ट किती केल्या जात आहेत, हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. भारतात देखील आवश्यक त्या प्रमाणात कोरोनाच्या टेस्ट केल्या जात नसल्याचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला जात आहे. सध्या कोरोनाच्या टेस्ट केल्यानंतर त्याचे रिपोर्ट येण्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागत आहे. मात्र, आता एका नव्या टेस्टचा शोध लावण्यात आला असून या टेस्टच्या माध्यमातून अवध्या मिनिटभरात एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली आहे की नाही, हे कळू शकणार आहे. इस्त्रायलच्या बेन गुरियन युनिव्हर्सिटीने हा दावा केला आहे. बेन गुरियन विद्यापीठातल्या संशोधकांचा दावा आहे की या टेस्टमधून ९० टक्के योग्य परिणाम मिळत आहेत.

सेन्सर ओळखतो कोरोना विषाणूला!

इस्त्रायलमधल्या संशोधकांनी दावा केला आहे की या टेस्टिंग किटमध्ये विशिष्ट प्रकारचे सेन्सर्स लावण्यात आले आहेत. या टेस्टसाठी व्यक्तीच्या नाक, घसा आणि फुंकरचे नमुने घेतले जातात. या नमुन्यांच्या आधारावरच समोरची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे किंवा नाही, हे कळू शकतं. शिवाय, एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नसतील, अशा व्यक्तीमधले कोरोना विषाणू देखील या टेस्टमध्ये सापडू शकतात. या चाचणीसाठी व्यक्तीला टेस्टिंग किटमध्ये फुंकर मारायला सांगितलं जातं. जर त्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाली असेल, तर त्याच्या फुंकरमधून जे ड्रॉपलेट्स किटमध्ये जमा होतील, त्याच्या माध्यमातून कोरोनाचा विषाणू किटच्या सेन्सर्सपर्यंत जातो आणि त्यातून व्यक्ती पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह, याची माहिती मिळते.

इतर पीसीआर टेस्टपेक्षा स्वस्त!

दरम्यान, संशोधकांनी दावा केला आहे की या किटचा वापर कुठेही करता येऊ शकतो. त्यामुळे टेस्ट फक्त प्रयोगशाळेतच केली जावी, याचं बंधन नसेल. या किटची किंमत ३८०० रुपये असेल, जी सध्याच्या इतर टेस्टच्या तुलनेत कमी आहे. या टेस्टची सध्या चाचणी सुरू असून सुरुवातीपासूनच या चाचणीमध्ये चांगले निष्कर्ष मिळाले आहेत. या टेस्टमुळे कमी वेळात जास्तीत जास्त रुग्णांची चाचणी करणं शक्य होणार आहे. इस्त्रायलच्या एफडीएची मान्यता मिळाल्यानंतर या टेस्टिंग किटचा व्यापक प्रमाणावर वापर करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

First Published on: May 29, 2020 10:11 PM
Exit mobile version