ब्रिटनमधील नवा कोरोना व्हायरस नियंत्रणाबाहेर, विमानांवर बंदी

ब्रिटनमधील नवा कोरोना व्हायरस नियंत्रणाबाहेर, विमानांवर बंदी

जगभरात अजूनही कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. जगातील कोरोनाबाधितांची संख्या ७ कोटी ७१ लाखांहून अधिक आहे. त्यामुळे सध्या अनेक देश कोरोना लसीच्या प्रतिक्षित आहेत. कोरोना लसीकरणात जगात ब्रिटनने पहिला नंबर लावला. पण आता ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसने नवे रुप धारण केल्याचे समोर आले आहे. ज्यानंतर ब्रिटन सरकारने देशातील चौथ्या टप्प्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट ह‌ॅकाँक म्हणाले की, ‘हा नवा कोरोना व्हायरस खूप भयानक आहे. या व्हायरसचा फैलाव अधिक झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या काही भागात कडक निर्बंध लागू केले आहेत. हा कोरोना व्हायरस ब्रिटनच्या दक्षिण-पूर्व भागात जास्त पसरला आहे.’ या सर्व गोष्टी लक्षात घेऊन युरोपमधील नेदरलँड्स आणि होलँडसारख्या काही देशांनी ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे.

यंदाचा ख्रिसमस सण पूर्वीप्रमाणे साजरा केला जाणार नाही

माहितीनुसार, ब्रिटनमध्ये जवळपास १.६ कोटी लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच लंडनमध्ये चौथ्या टप्प्यात निर्बंध लागू केले आहे. आतापर्यंत सर्वात कठीण निर्बंध ब्रिटनच्या सरकारने देशात जारी केले आहेत. यामुळे यंदा ब्रिटनमधील ख्रिसमस आणि नवे वर्षाचे सेलिब्रेशन पहिल्यासारखे करण्यात येणार नाही आहे.

पोलिसांना अनेक भागात केले तैनात

नवा कोरोना व्हायरसने जे काही रुप धारण केले आहे, त्यामुळे निवासी भागात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांना रेल्वे स्टेशनवर देखील तैनात करण्यात आले असून लोकांना प्रवास करण्यासाठी मनाई केली जात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडनसहित दक्षिण-पूर्व अनेक भागात ३० डिसेंबरपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

नव्या कोरोना व्हायरसवर ब्रिटनची लस परिणामकारक आहे की नाही?

दरम्यान ब्रिटनच्या कोरोना लसीकरणाबाबत आरोग्य सचिव मॅट ह‌ॅकाँक यांनी अशी माहिती दिली की, ‘शनिवारी सकाळीपर्यंत ३ लाख ५० हजार लोकांना कोरोना लस दिली गेली आहे. या आठवड्याच्या शेवटपर्यंत ५ कोटी लोकांना लस देण्याचे लक्ष्य आहे. पण आम्ही जी लस देत आहोत, ती या नव्या रुपाच्या कोरोना व्हायरसवर काम करेल की हे माहित नाही.’ या ब्रिटनमधील नव्या कोरोना व्हायरसमुळे भारत देखील सतर्क झाला आहे. यामुळे आरोग्य मंत्र्यांनी आज बैठक बोलावली आहे.


हेही वाचा – जानेवारीत लसीकरणाला सुरुवात?; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे संकेत


 

 

First Published on: December 21, 2020 10:25 AM
Exit mobile version