पश्चिम बंगालमध्ये एनआयएचे छापे; लाखोंची रोकड जप्त

पश्चिम बंगालमध्ये एनआयएचे छापे; लाखोंची रोकड जप्त

नवी दिल्लीः राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी पश्चिम बंगाल येथील १७ ठिकाणी छापे टाकले. गेल्यावर्षी एकबालपूर-मोमिनपूर येथे दोन गटात हाणामारी झाली होती. त्यातील संशयितांच्या घरी व कार्यालयात हे छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये तीन आरोपींच्या घरातून लाखो रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

छापेमारीत आरोपी मोहम्मद सिधिकी याच्या घरातून ३३ लाख ८७ रुपये जप्त करण्यात आले. झाकीरच्या घरातून १ लाख ६० हजार व टिपूच्या घरातून १ लाख ७३ हजार रुपये जप्त करण्यात आले. यावेळी धारधार शस्त्रेही एनआयएने जप्त केली. याचा पुढील तपास सुरु असल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्यावर्षी ९ ऑक्टोबरला दुर्गा पुजेच्या दिवशी दोन गटात हाणामारी झाली होती. स्थानिक पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला होता. याचा तपासही सुरु होता. मात्र याप्रकरणी कोलकत्ता उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली. दोन गटात झालेल्या हाणामारीचा तपास स्थानिक पोलीस योग्य पद्धतीने करत नाहीत. ही जातीय दंगल होती, या दृष्टीनेही या घटनेचा तपास करायला हवा. मात्र पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप कोलकत्ता उच्च न्यायालयात करण्यात आला होता.

ही हाणामारी जातीय द्वेषातून झाली आहे. धारधार शस्त्र घेऊन हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे याप्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. याची नोद करुन घेत कोलकत्ता उच्च न्यायालयाने याचा तपास करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांचे विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर केंद्र सरकारने याचा तपास एनआयएकडे सोपवला.

त्यानुसार बुधवारी एनआयएने छापेमारी केली. पुढील तपासात अजूनही पुरावे एनआयएच्या हाती लागतील, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले. हा हिंसाचार जातीय द्वेषातून झाला होता की ही घटना अचानक झालेल्या वादातून घडली हे तपासाअंती स्पष्ट होईल, असेही तपास अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

 

First Published on: January 4, 2023 10:22 PM
Exit mobile version