निर्भयाच्या आरोपींना फासावर लटकवून जल्लाद मोडणार पणजोबांचा रेकॉर्ड

निर्भयाच्या आरोपींना फासावर लटकवून जल्लाद मोडणार पणजोबांचा रेकॉर्ड

jallad

उत्तर प्रदेशातील मेरठ या शहरातील एका व्यक्तीला वारसा म्हणून घराण्याचे परंपरेने चालत आलेले ‘जल्लाद’चे काम मिळाले आहे. याच कुटुंबातील पवन जल्लादची ही चौथी पिढी तिहार तुरुंगात निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फाशी देणार आहे. त्यामुळे ते आपल्या पणजोबांचाच रेकॉर्ड मोडणार आहे.

तिहार तुरुंगाच्या इतिहासातच नव्हे तर भारताच्या इतिहासात आजतागायत कोणत्याही जल्लादने एकत्र चार – चार दोषींना फाशी दिलेली नाही. त्यामुळे हे पवन जल्लादच्या नशिबी आल्याने ते खुश आहेत. ‘मी तयार आहे. हा माझ्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे. पूर्वजांनी आयुष्यात एका वेळीच एका किंवा दोन दोषींना फाशी दिली होती. मी माझ्या आयुष्यात पहिल्याच वेळी एकत्र चार-चार दोषींना फासावर लटकवणार आहे,’असे पवन जल्लाद यांनी म्हटले आहे.

२२ जानेवारीला सकाळी सात वाजता या चौघांना फासावर लटकवले जाणार आहे आणि त्याची तयारी देखील सुरू आहे. देशात या कुटुंबातील लोकांना जल्लादांचे कुटुंब म्हणून ओळखले जाते. १९५० – ६० च्या दशकात या कुटुंबातील पहिल्या पिढीचे प्रमुख लक्ष्मण हे देशातील दोषींना फाशी देण्याचे काम करत होते. आता त्यांचा पणतू म्हणजेच लक्ष्मण यांचा मुलगा कालू राम जल्लाद यांच्या मुलाचा मुलगा पवन जल्लाद म्हणजेच या कुटुंबाची चौथी पिढी आयुष्यातील पहिली फाशी देण्याची तयारी करण्यात व्यस्त आहे.

पहिलाच रेकॉर्डब्रेक अनुभव

पवन जल्लादने याआधी जवळपास पाच फाशींमध्ये आजोबा कालू राम जल्लाद यांची मदत केली होती. त्या पाच फाशींच्या वेळी पवन यांनी फाशी देण्याच्या प्रक्रियेतील सर्व बारकावे आजोबा कालू राम यांच्याकडून शिकून घेतले होते. आता निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फासावर लटकवणे हा पवन जल्लादसाठी पहिलाच अनुभव असणार आहे.

First Published on: January 14, 2020 5:12 AM
Exit mobile version