दहशतवादी हल्ले होत असताना चर्चा अशक्य – सुषमा स्वराज

दहशतवादी हल्ले होत असताना चर्चा अशक्य – सुषमा स्वराज

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

‘जब सीमापर जनाजे उठ रहे हो, तो बातचीत की आवाज अच्छी नही लगती,’ अशा शब्दात भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानसोबत चर्चेची शक्यता फेटाळून लावली आहे. दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी सुरू ठेवता येणार नाही, असे त्यांनी सोमवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दहशतवादी हल्ले थांबवा, चर्चा करु

पाकिस्तानशी चर्चा करायला भारताने कधीही नकार दिलेला नाही. मात्र, सीमेवरील गोळीबारात भारतीय जवान शहीद होत असताना पाकिस्तानशी चर्चा करणे योग्य ठरणार नाही, असे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांनंतर नव्या सत्ताधाऱ्यांशी भारत चर्चा करणार का? असा प्रश्न स्वराज यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटले की, आम्ही पाकिस्तानशी निवडणुकीपूर्वीही ठोस चर्चा करायला तयार आहोत. आम्ही कधीच चर्चेला नकार देण्याचा पवित्रा घेतला नव्हता. आम्ही फक्त इशारा दिला होता. परंतु दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी सुरू ठेवता येणार नाही. आमच्या सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले होत असताना चर्चा करणे योग्य नाही, असे स्वराज यांनी म्हटले.

येत्या गुरुवारी पाकिस्तानची संसद बरखास्त होणार आहे. त्यानंतर २५ जुलै रोजी पाकिस्तानात निवडणुका होत आहेत. या काळात पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी नासिर उल मुल्क यांच्याकडे देण्यात आलेली आहे. ते पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश होते. आता त्यांच्याकडे पंतप्रधानपदाची अंतरिम जबाबदारी असेल. मुल्क यांनी यापूर्वी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाचे प्रमुखपद सांभाळले आहे. अंतरिम सरकारकडे मोठे निर्णय घेण्याचे फारसे अधिकार नसतात. फक्त नवे सरकार सत्तेत येईपर्यंत त्यांना सत्ता सांभाळावी लागते.

First Published on: May 30, 2018 10:45 AM
Exit mobile version