मोदी सरकारवर ‘विश्वास’

मोदी सरकारवर ‘विश्वास’

पंतप्रधान नरेंद्र मोदी

तब्बल ११ तास चाललेली चर्चा, शाब्दीक जुगलबंदी आणि आरोप-प्रत्योरोपांच्या फैरीनंतर मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव लोकभेमध्ये फेटाळाला गेला. मतदानासाठी लोकसभागृहात ४५१ सदस्य हजर होते. त्यापैकी ३२५ सदस्यांनी अविश्वास ठरावाविरोधात मतदान केले. तर १२६ सदस्यांनी अविश्वासदर्शक ठरावाच्या बाजुने मतदान केले. अविश्वास ठरावादरम्यान शिवसेनेने तटस्थ राहणे पसंत केले.तर बीजेडीने सभागृहातून बाहेर पडणे पसंत केले. आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न मिळाल्याने तेलगु देसम पार्टी अर्थात टीडीपीने केंद्र सरकारविरोधात संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास ठराव मांडला होता. त्यावर चर्चा झाल्यानंतर अविश्वास ठराव ३२५ विरूद्ध १२९ मतांनी फेटाळला गेला.

जयदेव गल्ला यांनी मांडला अविश्वास ठराव

तेलगु देसम पार्टीचे खासदार जयदेव गल्ला यांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. आश्वासन देऊनही आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जाचा न दिल्याने टीडीपीने केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला. त्यावर शुक्रवारी लोसभेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यावेळी गल्ला यांनी केंद्र सरकार तेलंगणाला झुकतं माप देत असल्याचा आरोप केला.

लोकसभेत वादळी चर्चा

अविश्वास ठरावादरम्यान लोकसभेमध्ये वादळी चर्चा झाली. यावेळी टीडीपी खासदार जयदेव गल्ला यांनी केंद्र सरकारने आंध्रप्रदेशचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील भाजपवर जोरदार हल्ला चढवला. निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडला असून भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौकीदार नसून भागिदार असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला. दरम्यान राफेल करारामध्ये देखील मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्याने संरक्षणमंत्री निर्मला सितारामण चांगल्याच आक्रमक झाल्या. भाषणाच्या शेवटी राहुल गांधी माझ्या मनात तुमच्याबद्दल द्वेष नसल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली.

मोदींचे राहुल गांधी यांना प्रत्युत्तर

प्रत्युत्तरादाखल केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या प्रत्येक आरोपांना उत्तर दिले. यावेळी राहुल गांधी यांनी केलेल्या भागीदारीच्या टीकेला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खास शैलीमध्ये प्रत्युत्तर दिले. दरम्यान राहुल गांधी यांनी म्हटले पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या नजरेला नजर भिडवून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाहीत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्ही नामदार आहात मी इनामदार आहे असे प्रत्युत्तर दिले. या सर्व राजकीय घडामोडी पाहता लोसकसभेतील दिवस गाजला तो अविश्वास ठरावादरम्यान झालेल्या राजकीय जुगलबंदीमुळे.

‘आम्ही गदा उपसली’

आम्ही गदा उपसली. वेळोवेळी ती सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात पडलेली आहे. यापुढे ही पडेल अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी अविश्वास ठरावावर आपली भूमिका स्पष्ट करताना दिली.

सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस

राहुल गांधी यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. यावरून सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस पडत आहे.

 

वाचा – अविश्वासदर्शक ठरावावर आज चर्चा; शिवसेना गोंधळात

वाचा  – भाजपसाठी मी पप्पू असेन; पण माझ्या मनात द्वेष नाही

First Published on: July 21, 2018 8:28 AM
Exit mobile version