उत्तरप्रदेशात कब्रस्तान नाही तर मंदिरांवर खर्च होतोय जनतेचा पैसा- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशात कब्रस्तान नाही तर मंदिरांवर खर्च होतोय जनतेचा पैसा- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशात कब्रस्तान नाही तर मंदिरांवर खर्च होतोय जनतेचा पैसा- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

“भाजप सरकार जनतेचा पैसा कब्रस्तानच्या जागा खरेदीसाठी नाही, तर मंदिरांच्या पुनर्बांधणी आणि सुशोभीकरणावर खर्च करते” असं म्हणत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आधीच्या सरकारची खिल्ली उडवली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या भव्य दीपोत्सव कार्यक्रमाला योगींनी उपस्थित राहत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लोकांना पुढील वर्षी होळीपर्यंत मोफत रेशन मिळत राहील, अशी घोषणा केली आहे.

यावेळी योगींनी असेही सांगितले की, कोरोना महामारीदरम्यान गरीब लोकांना मोफत रेशन देण्याची ही योजना यावर्षी नोव्हेंबरमध्ये संपत आहे, परंतु सरकारने ती पुढील वर्षी होळीपर्यंत म्हणजेच मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महामारी अजून संपलेली नाही, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लोकांना गहू, तांदळासह मीठ, साखर, डाळी आणि तेल मिळणार आहे. उत्तर प्रदेशातील १५ कोटी लोकांना या योजनेचा फायदा होणार आहे. सीएम योगी यांनी ६६१ कोटी रुपये खर्चाच्या ५० वेगवेगळ्या प्रकल्पांचे लोकार्पण केले. विशेष म्हणजे पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर प्रदेशात निवडणुका होणार आहेत.

२०२३ पर्यंत तयार होईल राम मंदिर

योगी म्हणाले की, “अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू असून ते २०२३ पर्यंत पूर्ण होईल. यासोबतच केंद्र सरकार उत्तर प्रदेशातील ५०० मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण करत आहे. यातील ३०० हून अधिक साईट्सवरील काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित साईट्सवरील काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होणार आहे.”

३१ वर्षांपूर्वी कार सेवेत रामभक्तांवर झाडण्यात आल्या गोळ्या

मागील सरकारांवर निशाणा साधत मुख्यमंत्री योगी म्हणाले की, “तुम्हाला आठवत असेल की आजपासून बरोबर ३१ वर्षांपूर्वी म्हणजे ३० ऑक्टोबर १९९० आणि २ नोव्हेंबर १९९० रोजी या अयोध्येत रामभक्त आणि कारसेवकांवर गोळीबार झाला होता. त्यावेळी “जय श्री राम” घोषणा देत राम मंदिरासाठी आवाज उठवणे हा गुन्हा मानला जात होता, पण लोकशाहीची ताकद किती मजबूत असते, यातून असे लक्षात आणून दिले की, ३१ वर्षांपूर्वी रामभक्तांवर गोळीबार करणाऱ्यांना लोकशाही सत्तेपुढे नतमस्तक व्हावे लागत आहे. अजून काही वर्षे काढली तर पुढच्या कार सेवेसाठी त्या लोकांचे संपूर्ण कुटुंब रांगेत उभे असलेले दिसेल. पुढील कारसेवा होईल तेव्हा गोळी चालणार नाही, त्यावेळी रामभक्तांवर फुलांचा वर्षाव होईल, ही लोकशाहीची ताकद आहे.”


 

First Published on: November 4, 2021 2:09 PM
Exit mobile version