आता LPG ग्राहकांना वर्षाला मिळणार 15 सिलिंडर, जाणून घ्या…

आता LPG ग्राहकांना वर्षाला मिळणार 15 सिलिंडर, जाणून घ्या…

नवी दिल्ली – घरगुती एलपीजी ग्राहकांना सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला समोरे जावे लागणार असून नव्या नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत. दरम्यान सिलेंडरचा एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. कोणत्याही ग्राहकाला एका महिन्यात 2 सिलेंडर मिळणार आहेत. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना वर्षभरात लागतील तेवढे सिलेंडर मिळत होते. मात्र, नव्या नियमांनुसार घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत.

यामुळे घेतला निर्णय –

घरगुती एलपीजी सिलेंडरवर घालण्यात आलेल्या मर्यादेबाबत वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलेंडरसंदर्भातील रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच, याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे.  यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अनुदानित घरगुती गॅसचे रीफिल हे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या रिफिलहून स्वस्त असल्याने अनेकदा व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस रीफिलचा वापर केला जातो. यासंदर्भातील अनेक तक्रारी वारंवार समोर येत असल्याने घरगुती एलपीजी सिंलेडरवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

फक्त 12 अनुदानित सिलेंडर –

अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी नोंदणी केलेल्या ग्राहकांना वर्षभरात फक्त 12 अनुदानित सिलेंडर मिळणार आहेत. या पेक्षा जास्त सिलेंडरची गरज भासल्यास ग्राहकांना अनुदान नसलेले सिलेंडर घ्यावे लागणार आहेत. तिनही तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली आहे.

First Published on: September 29, 2022 8:13 AM
Exit mobile version