Coronavirus: अमेरिका, पाकिस्तान नंतर आता युएई मागतोय भारताकडे मदत

Coronavirus: अमेरिका, पाकिस्तान नंतर आता युएई मागतोय भारताकडे मदत

जग सध्या कोरोना विषाणूच्या संकटाशी झुंज देत आहे. सर्वात मोठ्या महासत्तेने या विषाणूच्या समोर हात टेकले आहेत. या आपत्तीच्या काळात भारत जगातील असा एक देश म्हणून उदयास आला आहे, जो सर्वांना मदत करत आहे. संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) आता हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध मागितलं आहे, ज्यावर भारताने मदतीचं आश्वासन दिलं आहे. याआधी हे औषध अमेरिकेने मागितलं होतं. यावरुन बरीच चर्चा झाली होती. या औषधासाठी ट्रम्प यांनी सुडाची भाषा केली होती. त्यानंतर हे औषध बरंच चर्चेत आलं.

मलेरियावरील हे औषध कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धात प्रभावी असल्याचं सिद्ध होत आहे. युएईमध्ये भारताचे राजदूत पवन कपूर यांनी एका वृत्त संस्थेला सांगितलं की, युएईच्या काही कंपन्यांनी भारतासमोर हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची विनंती केली आहे, त्यांनी आमच्याकडे हे बोलून दाखवलं, त्यानंतर हा संदेश दिल्लीपर्यंत पोहोचवण्यात आला. पवन कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत सरकार लवकरच यावर निर्णय घेत आहे. युएईला लवकरच या औषधाचा पहिला हप्ता मिळू शकेल. काही दिवसांपुर्वी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाच्या पुरवठ्यावरील बंदी भारताने काढून टाकली आहे आणि ज्या देशांमध्ये परिस्थिती सर्वात वाईट आहे तिथे देण्याचं आश्वासन दिलं आहे. तथापि, युएईमध्ये सध्या अशा प्रकारची कोणतीही परिस्थिती नाही, परंतु संबंध लक्षात घेता भारत त्यावर निर्णय घेऊ शकेल. आतापर्यंत हे औषध अमेरिका, जर्मनी, इस्त्राईल, ब्राझील, नेपाळसह १३ देशांना देण्यात आलं आहे.


हेही वाचा – अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं भविष्य पिचाई, नादेलासह ६ भारतीयांच्या हातात

युएईमध्ये अडकलेल्या भारतीयांचं काय?

कोरोना विषाणूमुळे बर्‍याच देशांमध्ये लॉकडाउनची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि कामकाज ठप्प झालं आहे. अशा परिस्थितीत युएईमध्ये बरेच भारतीय आहेत ज्यांना घरी परत यायचं आहे. या विषयावर पवन कपूर म्हणाले की, इथे सुमारे ३४ लाख भारतीय लोक राहतात, परंतु त्यांच्यात फारच कमी लोक आहेत ज्यांना घरी परत यायचं आहे.
ते म्हणाले की येथे राहणाऱ्या सर्व लोकांना वैद्यकीय मदत दिली जात आहे, परंतु कोणालाही त्वरित परत पाठवणं शक्य नाही. कारण भारतात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आहे आणि उड्डाण सेवा पूर्णपणे बंद आहे. परंतु परिस्थिती थोडी नीट झाली तर ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी व्यवस्था केली जाईल.

 

First Published on: April 16, 2020 9:12 AM
Exit mobile version