राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजनेला स्थगिती; पुढे चालू ठेवण्यासाठी केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजनेला स्थगिती; पुढे चालू ठेवण्यासाठी केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा

प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना अधिकाधिक विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना स्थगित देण्यात आली आहे. ही योजना पुढे चालू ठेवण्यास केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अद्याप नव्याने मंजुरी दिलेली नाही. ‘एनटीएस’ परीक्षा योजना स्थगितीबाबतचे परिपत्रक ‘एनसीईआरटी’ने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. (NTSE 2022 exam put on hold till further notice NCERT)

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत देशपातळीवर घेण्यात येते. या परीक्षेसाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) ही संस्था समन्वयक संस्था (नोडल एजन्सी) म्हणून काम करते. 10 वीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते.

राज्य आणि राष्ट्रीय अशा दोन स्तरांवर परीक्षा होऊन राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी राज्यनिहाय कोटा निश्चित करण्यात येतो. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना 11 वी ते पीएच.डी.पर्यंत शिष्यवृत्ती मिळते.

दरम्यान, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजनेसाठी 31 मार्च 2021 पर्यंतची मान्यता देण्यात आली होती. सद्यस्थितीत ही योजना पुढे राबवण्यासाठी अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत योजना स्थगित करण्यात येत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. 2014-15 मध्ये या परीक्षेची शिष्यवृत्ती वाढवण्यात आली.

त्यावेळी 11 वी आणि 12 वीसाठी 1250 रुपये दर महिना, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी स्तरासाठी 2000 रुपये दर महिना आणि पीएच.डी.साठी ‘यूजीसी’च्या निकषांनुसार शिष्यवृत्तीची रक्कम देण्याचे निश्चित करण्यात आले.


हेही वाचा – दीड वर्षाच्या बाळाचा केलेला उल्लेख बाळासाहेबांनाही आवडला नसता; मनसेची ठाकरेंवर टीका

First Published on: October 7, 2022 10:42 AM
Exit mobile version