Asani Cyclone : ओडिसा-आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला धडकणार असनी चक्रीवादळ

Asani Cyclone : ओडिसा-आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला धडकणार असनी चक्रीवादळ

अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेले असनी चक्रीवादळ मंगळवारी आंध्रप्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. शनिवारी असनी चक्रीवादळाचं रूपांतर तीव्र चक्रीवादळामध्ये झालं आहे. सध्या या चक्रीवादळाचा वेग ताशी ८० ते ९० कि.मी. असून मंगळवारी हा वेग ताशी १०० ते १२० कि.मी. इतका वाढण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ सध्या अंदमान निकोबार बेटांपासून २७० किलोमीटर, पोर्टब्लेअरपासून ४५० कि.मी., तर आंध्रप्रदेश व पुरीपासून ६१० कि.मी. अंतरावर खोल समुद्रात आहे. बुधवार ११ मेनंतर या चक्रीवादळाचा वेग कमी होऊन तो ६० ते ७० प्रति तास एवढा होईल. गुरूवारी १२ मेनंतर या चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. या चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागांत पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १० ते १३ मे रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर १३ मे रोजी पुणे, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड आणि अहमदनगर या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याशिवाय ११ ते १३ मे दरम्यान मुंबई, परभणी, कोल्हापूर आणि सातारा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसंच, आगामी तीन दिवस देशभर उष्णतेची लाट असणार आहे. देशातील राजस्थान, दिल्ली, हरियाणा, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत पुढील तीन दिवस अतितीव्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
राज्यातील अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या भागात उष्णतेच्या लाटेचा पिवळा इशारा देण्यात आला आहे. १० मे रोजी आंध्रप्रदेश, ओडिसा, तर ११ मे रोजी आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिसा या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – केंद्राची मोठी घोषणा, देशात ई – जनगणना होणार

First Published on: May 10, 2022 7:55 AM
Exit mobile version