‘ओला-उबर’चा संप स्थगित; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

‘ओला-उबर’चा संप स्थगित; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

शनिवार मध्यरात्रीपासून ओला, उबर टॅक्सीचे ड्रायव्हर पुन्हा एकदा संपावर गेले होते. मात्र, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर ओला-उबरचा संप स्थगिक करण्यात आला आहे. संपाच्या मुद्द्यावरुन धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते सचिन अहिर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हा ओला, उबर चालकांनी संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाणार आहे. मात्र, ‘या भेटापूर्वी ट्रान्सपोर्ट समितीच्या अध्यक्षांनी एक अवहाल तयार करुन तो मुख्यमंत्र्यांना आणि विशेषत: परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना द्यावा. जेणेकरुन त्यावरुन मुख्यंमंत्री योग्य तो निर्णय घेऊ शकतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितले.

चर्चेतून प्रश्न सोडवू

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्या नंतर राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. ओला – उबर चालक आणि संबंधित कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी एकत्रित चर्चा करू. या चर्चेतून ओला उबर चालकांचे प्रश्न सोडवू. ओला – उबर चालकांची ६० हजार कुटुंब कंपन्यांच्या मनमानीमुळे भरडली जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ही आमचे समाधान झालेले नाही.पण त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून संप स्थगित करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पूर्ण न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल असा इशाराही अहिर यांनी दिला.

आश्वासन न पाळल्यामुळे पुन्हा पुकारला संप

आपल्या मागण्यांसाठी दिवाळीपूर्वी सलग १२ दिवस ओला उबर चालक-मालक संघटना संपावर गेल्या होत्या. दरम्यान, १२ दिवसांच्या नुकसान भरपाईसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत एक विशेष दिवाळी ऑफर देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच भविष्यात वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीनुसार प्रत्येक किलोमीटरमागे दर वाढवून देण्याचा प्रस्ताव आणणार असल्याचे आश्‍वासनही देण्यात आले होते. त्या आश्वासनानंतर ओला-उबेरकडून संघटनेकडून संप मागे घेण्यात आला होता.  मात्र, परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न केल्यामुळे ओला आणि उबेर वाहन चालक १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपावर जाण्याचा इशारा ओला आणि उबेर वाहनचालकांनी दिला होता. त्यानुसार, शनिवारी मध्यरात्रीपासून पुन्हा आंदोलन करण्यात आले होते.

प्रमुख मागण्या काय?

ऑनलाइन टॅक्सीचे कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपये दरम्यान असावे

प्रति किलोमीटरमागे १८ ते २३ रुपये भाडे असावे

कंपनीने नवीन वाहने बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावे

First Published on: November 19, 2018 5:05 PM
Exit mobile version