Omicron बोंबला, सिंगापूर अहवालाने डोकेदुखी वाढवली, कोरोनामुक्तांना संसर्गाचा सर्वाधिक धोका

Omicron बोंबला, सिंगापूर अहवालाने डोकेदुखी वाढवली, कोरोनामुक्तांना संसर्गाचा सर्वाधिक धोका

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमीक्रॉन ३८ देशात पोहचला असून संपूर्ण जगात पुन्हा एकदा भीतिचे सावट पसरले आहे. याचदरम्यान, सिंगापूरमधून ओमीक्रॉनविषयी डोकेदुखी वाढवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना मुक्तांना पुन्हा ओमीक्रॉनची लागण होत असल्याचा अहवाल सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने जगासमोर सादर केला आहे.

या अहवालात ओमीक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा आणि बीटा या व्हेरियंटच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर या दोन व्हेरियंटपेक्षा ओमीक्रॉनचा पुन्हा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

येथील न्यूज एशिया या वृत्तवाहीनीवर आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीच्या हवाल्याने ही बातमी देण्यात आली आहे. त्यानुसार कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना ओमीक्रॉनचा संसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. रविवारी येथे एका ३७ वर्षीय व्यक्तीलाओमीक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले. या व्यक्तीने कोरोना लसीचे दोन्ही डोसही घेतले होते. यामुळे त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

तर दुसरीकडे लस घेतलेल्या व्यक्तीला याची लागण जरी झाली तरी ते तीन चार दिवसात घरीच पूर्ण बरे होत आहेत. तर ज्यांनी लसच घेतली नाही त्यांच्यासाठी मात्र ओमीक्रॉन धोकादायक ठरत असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. तसेच अद्यापपर्यंत ओमीक्रॉनमुळे मृत्यू झालेले नाहीत. यामुळे घाबरण्याचे कारण जरी नसले तरी सावध राहणे गरजेचे असल्याचे सिंगापूर आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

First Published on: December 6, 2021 8:32 PM
Exit mobile version