एक लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक, उद्योजकांना रेड कार्पेट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

एक लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक, उद्योजकांना रेड कार्पेट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

सिंगापूरच्या माहिती व दूरसंचार मंत्री जोसफाईन (Josphine TEO) यांनी दावोस येथे महाराष्ट्र पॅविलियन येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व दूरसंचार सुविधांविषयक चर्चा केली.

स्वित्झरलॅंडः दावोस येथील उद्योजकांच्या परिषदेत महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे एमओयू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उद्योजकांना रेड कार्पेट देण्यात येणार आहे. लवकरच महाराष्ट्रात उद्योग सुरु होतील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची आणि महाराष्ट्राची छाप या आर्थिक परिषदेत दिसून आली. दावोस येथे १ लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्यातून सुमारे एक लाख रोजगार निर्माण होतील. हे आमच्या सरकारचे मोठे यश आहे. अधिकाधिक उद्योग महाराष्ट्रात यावे यासाठी आमच्या सरकारने धोरणात बदल केले आहेत. गुंतवणूकदारांसाठी एक लाख खिडकी योजना. कॅपिटल व जीएसटी टॅक्समध्ये सबसिडी. नवीन तंत्रज्ञान असलेल्या उद्योगांना विशेष पॅकेज देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्रात चांगल्या पायाभूत सुविधा आहेत. उत्तम मनुष्यबळ आहे. त्यामुळे उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.

अशी आहे गुंतवणूक

हायटेक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात ५४ हजार २७६ कोटी

हायटेक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सहा कंपन्यांसोबत ५४ हजार २७६ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले आहे. त्याद्वारे ४३०० रोजगार निर्माण होणार आहेत.

ऊर्जा आणि इलेक्ट्रीकल व्हेईकल क्षेत्रात ४६ हजार ८०० कोटी

ऊर्जा क्षेत्रातील नविनीकरणीय ऊर्जा आणि इलेक्ट्रीकल व्हेईकल क्षेत्रात ४६ हजार ८०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामाध्यमातून ४५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.

आयटी, फिनटेक, डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये ३२ हजार ४१४ कोटी

माहिती तंत्रज्ञान (आयटी), फिनटेक, डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये ३२ हजार ४१४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून ८७०० जणांना रोजगार मिळणार आहे. लोह उत्पादन क्षेत्रात २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून ३००० जणांना रोजगार मिळणार आहे. कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रामध्ये १९०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले असून त्यामुळे सुमारे ६०० जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

उद्योग वाढीला चालना देण्यासाठी नवीन धोरण

राज्य शासनामार्फत जनतेच्या हिताच्या निर्णयासोबतच उद्योग वाढीला चालना मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनी उद्योजकांसाठी नवीन धोरण ठरविण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नविन धोरणामध्ये एक खिडकी योजना, भांडवली अनुदान, जीएसटी कर अनुदान त्याच बरोबर नविन तंत्रज्ञान आणि मोठ्या उद्योगांना विशेष पॅकेज देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

सामंजस्य करार

पुणे – रुखी फूड्स – ग्रीन फिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प – 250 कोटी गुंतवणूकपुणे – निप्रो कार्पोरेशन (जपान) – ग्लास ट्युबिंग प्रकल्प – 1,650 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार)
पुणे-पिंपरी – एलाईट प्लास्ट अँटो सिस्टीम्स (पोर्तुगाल) – प्लास्टिक ऑटोमोटिव्ह प्रकल्प – 400 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार)
मुंबई – इंड्स कॅपिटल पार्टनर्स – आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण सेवा – 16000 कोटी गुंतवणूक
औरंगाबाद – ग्रीनको – नवीनीकरण ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी) प्रकल्प – 12,000 कोटी गुंतवणूक – (6,300 रोजगार)
चंद्रपूर- भद्रावती – न्यू एरा क्लीनटेक सोल्युशन (अमेरिका) – कोल गॅसिफिकेशन प्रकल्प – 20,000 कोटी गुंतवणूक – (15,000 रोजगार)
चंद्रपूर -मूल – राजुरी स्टील अँड अलाईज (इस्राईल) – स्टील प्रकल्प – 600 कोटी गुंतवणूक – (1000 रोजगार निर्मिती)
गडचिरोली – चार्मिशी – वरद फेरो अलाईज – स्टील प्रकल्प – 1,520 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार निर्मिती)
महाराष्ट्र – गोगोरो इंजिनीअरिंग & बडवे इंजिनीअरिंग – ऑटो प्रकल्प – 20,000 कोटी गुंतवणूक – (30,000 रोजगार)
महाराष्ट्र – बर्कशायर-हाथवे – नागरी पायाभूत सुविधा – 16,000 कोटी गुंतवणूक
महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल, 10,000 कोटी गुंतवणूक – (3000 रोजगार)
लक्झम्बर्ग इन्व्हेस्टमेंट कंपनी – 12000 कोटी गुंतवणूक – (1,200 रोजगार)
हंस इन्फ्रोसोल्युशन प्रा. लि. वूडवीन -4000 कोटी गुंतवणूक – (800 रोजगार)
मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर येथे – जपानच्या निप्पॉन टेलेग्राफ एंड टेलिफोन – डेटा सेंटर्स- 20,414 कोटी गुंतवणूक – (1525 रोजगार )

नॉलेज पार्टनरशिपसाठी करार

मुंबई महानगर- कॅलिफॉर्निया विद्यापीठ (बर्कले)समवेत स्मार्ट सिटी सामंजस्य करार
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसमवेत नागरी परिवर्तनासाठी सामंजस्य करार
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसमवेत न्यू इकॉनॉमी एंड सोसायटी साठी सामंजस्य करार
स्विस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्ससमवेत गुंतवणूक आणि व्यापारविषयक सहकार्यासाठी सामंजस्य करार

 

First Published on: January 18, 2023 1:22 PM
Exit mobile version