कपील सिब्बल यांच्या घरी विरोधकांची काँग्रेसच्या नेतृत्त्वावर चर्चा; चर्चेत शरद पवारही सहभागी

कपील सिब्बल यांच्या घरी विरोधकांची काँग्रेसच्या नेतृत्त्वावर चर्चा; चर्चेत शरद पवारही सहभागी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील कपिल सिब्बल यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी सोमवारी डिनरचं आयोजन केलं होतं. १५ पक्षांचे सुमारे ४५ नेते आणि खासदार सोमवारी डिनरच्या निमित्ताने एकत्र आले होते. कपिल सिब्बल यांनी वाढदिवसानिमित्त हे डिनरचं आयोजन केलं असलं तरी यावेळी चर्चा मात्र मोदी सरकारविरोधात सुरु होती. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसमधील बदलांसंबंधीही प्रश्न उपस्थित करण्यात आले. गांधी कुटुंबाने नेतृत्व सोडलं तरच पक्ष मजबूत करणं शक्य असल्याचंही मत यावेळी काहीजणांनी व्यक्त केल्याचं वृत्त एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. या चर्चे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील सहभाग घेत मत व्यक्त केलं.

राहुल गांधी सोमवारी दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत आणि या दरम्यान विरोधक डिनरच्या निमित्ताने एकत्र आले. डिनर पार्टीचं आयोजन करणारे कपिल सिब्बल हे G23 चे सदस्य आहेत जे काँग्रेस नेतृत्वावर असमाधानी असल्याचे सांगितले जातं. त्यांच्या व्यतिरिक्त, G23 चे अनेक मुख्य सदस्य देखील या डिनरला उपस्थित होते. ज्यात गुलाम नबी आझाद, भूपिंदर सिंग हुडा, आनंद शर्मा, मनीष तिवारी, शशी थरूर आणि संदीप दीक्षित यांची नावे महत्त्वाची आहेत.

पक्षातील नेत्यांनी आणि इतर विरोधी पक्षांतील नेत्यांनी काँग्रेस अजून मजबूत झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं. त्यासाठी नेतृत्व बदल आवश्यक आहे. मात्र, अनेक नेते राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत यासाठी ताकद लावत आहेत.

कपिल सिब्बल यांच्या घरी आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन, सीपीआयचे नेते सीताराम येचुरी आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत या नेत्यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर बीजेडीच्या पिनाकी मिश्रा, अकाली दलाचे नरेश गुजराल आणि आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांनीही यात भाग घेतला. यासोबत टीडीपी, टीआरएस आणि वायएसआर काँग्रेस आणि आरएलडीचे नेतेही सहभागी झाले होते.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपिल सिब्बल यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करताना म्हटलं की, काँग्रेसचा सैनिक म्हणून आम्हाला भाजपच्या विरोधात एक मजबूत मोर्चा बनवायचा आहे. सर्व नेत्यांनी सिब्बल यांच्या मुद्द्याचे समर्थन केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार – शरद पवार सर्वात जास्त वेळ बोलले. ते म्हणाले की मी तुमच्याशी सहमत आहे. तुम्ही पक्षात आणि बाहेर जे काही मुद्दे मांडता ते बरोबर आहेत. यावर सिब्बल म्हणाले की, आम्ही पक्षात काय मांडतो ही वेगळी बाब आहे पण इथे प्रश्न विरोधी एकतेचा आहे.

लालू यादव यांचा तुरुंगातून सुटका आणि तब्येत ठिक झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत हा पहिला सामूहिक डिनर होता. यावेळी लालू यादव यांनीही सिब्बल यांच्याशी सहमती दर्शवली आणि विरोधी एकजूट मजबूत करण्याच्या दिशेने पावले उचलण्याची गरज आहे. जेव्हा जेव्हा आपण संकटात येतो तेव्हा आपल्याला सिब्बल साहेबांची आठवण येते. काँग्रेस पक्षाने या लोकांच्या अनुभवाचा लाभ घ्यावा.

 

First Published on: August 10, 2021 10:39 AM
Exit mobile version