‘मोदी सगळे श्रेय स्वत:कडेच घेत आहेत, चित्रपटाच्या आधीच्या प्रसंगाचे काय?’

‘मोदी सगळे श्रेय स्वत:कडेच घेत आहेत, चित्रपटाच्या आधीच्या प्रसंगाचे काय?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मसूद अझहरला संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांमध्ये हा मुद्दा मांडला होता. योग्य आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात येत होते. मात्र, यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय घोषित होण्यामागे काँग्रेसचे देखील योगदान मोठे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी काँग्रेस २००९ पासून प्रयत्न करत असल्याचे काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रिय मंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी चित्रपटाच्या शेवटचा भाग दाखवून श्रेय लुट आहेत’, अशी टीका चिदंबरम यांनी केली आहे.

‘त्यावेळी काँग्रेसचे राज्य होते’

हाफिज सईद आणि लख्वीला कोणाच्या काळात आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले गेले? असा प्रश्न पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यापुढे ते म्हणाले की, त्या काळात काँग्रेसचे राज्य होते. मात्र, भाजपला याचा सोयीस्कर विसर पडलेला दिसतो. अझहर हा दजतिक दहशतवाद्यांच्या यादीत नाव असलेला पहिला दहशतवादी नाही. आम्ही आमच्या काळापासून प्रयत्न केले, त्या प्रयत्नाला आता यश आल्याचे चिदंबरम म्हणाले.

मसूद पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड

१४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. हा हल्ला जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरने घडवून आणला होता. या हल्ल्यानंतर अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेत केली होती. मात्र, चीनने त्याच आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, बुधवारी चीनने देखील आपली हरकत मागे घेतली. त्यामुळे मसूद अझहरला संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. दरम्यान, या गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी भारतात काँग्रसे आणि भाजप पक्षांमध्ये चढाओढ सुरु झाली आहे.

First Published on: May 4, 2019 7:03 PM
Exit mobile version