बलुचिस्तान पुन्हा हादरले; १४ प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या

बलुचिस्तान पुन्हा हादरले; १४ प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या

१४ प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी १४ प्रवाशांची हत्या केली आहे. बलुचिस्तानच्या एका राज्यमहामार्गावरुन जाणाऱ्या बसमधील १४ प्रवाशांना खाली उतरवून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली आहे. पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, १५ ते २० सशस्त्र हल्लेखोरांनी मकरान कोस्टल महामार्गावरुन जाणाऱ्या बसला अडवले. कराची आणि ग्वादर दरम्यान पाच ते सहा बसला थांबवून या हल्लेखोरांनी १४ जणांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी पाकिस्तानी सैन्यांचा गणवेश घातला होता. मकरान कोस्टल महामार्गावरुन जाणाऱ्या बसला हल्लेखोरांनी अडवले. या बसमधील १६ प्रवाशांना त्यांनी खाली उतरवले. त्यानंतर यामधील १४ प्रवाशांवर गोळ्या झाडल्या. दरम्यान, या हल्लेखोरांनी बुजी टॉप भागामध्ये प्रवाशांचे ओळखपत्राची तपासणी केली होती. १४ प्रवाशांमधील २ प्रवासी पळून जाण्यात यशस्वी झाले.

हे दोन प्रवासी नजीकच्या चेक पोस्टपर्यंत पळून गेल्यामुळे सुदैवाने ते वाचले. मात्र त्यांना गोळी लागली असून त्यांच्यावर ओरमारा येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याप्रकरणाचा तपास सुरु केला. हल्लेखोरांनी प्रवाशांची हत्या का केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. हे हल्लेखोर फरार झाले असून पोलिसांकडून याचा तपास सुरु आहे.

अशी घटना बलुचिस्तानमध्ये पहिल्यांदाच घडली नाही. तर या आधी २०१५ मध्ये मास्टुंग भागामध्ये अशीच घटना घडली होती. तेव्हा कराची ट्रेनचे दोन डब्यामध्ये प्रवास करणाऱ्या २४ प्रवाशांनी सेनेच्या कर्मचाऱ्यांचे अपहरण करुन त्यामधील १९ जणांची निर्घृण हत्या केली होती. तर मागच्या आठवड्यात क्वेटामध्ये हजारा समुदायाच्या लोकांना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला होता.

First Published on: April 18, 2019 12:29 PM
Exit mobile version