Video: ‘हमने हिंदुस्तान को घुस के मारा’, पुलवामाच्या हल्ल्याची पाकिस्तानी मंत्र्याची कबुली

Video: ‘हमने हिंदुस्तान को घुस के मारा’, पुलवामाच्या हल्ल्याची पाकिस्तानी मंत्र्याची कबुली

पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानकडूनच करण्यात आला होता, हे आता स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी गुरुवारी संसदेत बोलत असताना ‘हमने हिंदुस्तान को घुस के मारा’ असे वक्तव्य केले. या हल्ल्याबाबत त्यांनी पाकिस्तानी सैन्य आणि पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार देखील व्यक्त केले. पाकिस्तान हा दहशतवादाला पोसणारा देश आहे, हा दावा भारत जगासमोर करत आलेला आहे, तो दावा अखेर खरा ठरला आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या तुकडीच्या ताफ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते.

पाकिस्तानच्या संसदेत खासदार अय्याज सादिक यांनी हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका केल्याबद्दल पाकिस्तान सरकारवर टीका केली होती. भारत आपल्यावर हल्ला करेल, या भीतीतून अभिनंदन यांना सोडण्यात आले, असाही दावा त्यांनी केला. खासदार अय्याज सादिक यांना उत्तर देत असताना मंत्री फवाद चौधरी यांनी इम्रान खान सरकारचे गोडवे गायले. आम्ही भारताला घाबरत नसून भारताच्या घरात घुसून त्यांना मारले आहे. पुलवामा हे इम्रान खान सरकारने मोठे यश असल्याचा फुत्कार फवाद चौधरी यांनी सोडला.

संसदेत भारतावरील हल्ल्याची कबुली दिल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणींत आता वाढ होऊ शकते. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) कडून काळ्या यादीत जाण्याची भीती असल्यामुळे पाकिस्तान जगासमोर आपला सोज्वळ चेहरा दाखवायचा. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत नाही, असा खोटा दावा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच करण्यात येत होता. मात्र संसदेत सरकारच्या मंत्र्यानेच हल्ल्याची जबाबदारी सरकारची असल्याचे सांगितल्यामुळे FATF कडून कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दर FATF ने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले, तर आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.

 

First Published on: October 29, 2020 8:18 PM
Exit mobile version