Indian Fisherman Death : पाकिस्तानच्या तुरुंगात पालघरच्या मच्छिमाराचा मृत्यू; काय आहे प्रकरण?

Indian Fisherman Death : पाकिस्तानच्या तुरुंगात पालघरच्या मच्छिमाराचा मृत्यू; काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेला भारतीय मच्छिमार विनोद लक्ष्मण कोल याचा 17 मार्च रोजी मृत्यू झाला आहे. तो पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील रहिवासी आहे. विनोद लक्ष्मण याचा मृतदेह 29 एप्रिल रोजी हडाणू येथील गोरटपाडा येथील त्याच्या गावी पोहण्याची शक्यता आहे. (Palghar fisherman dies in Pakistan jail)

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कोल हा गुजरातमध्ये नोंदणीकृत मासेमारी बोटीवर काम करत होता. त्याने मासेमारीच्या बोटीवर काम करण्यास सुरुवात केल्यानंतर 2 महिन्यांनी पाकिस्तानी सागरी हद्दीत प्रवेश केल्यामुळे त्याला पाकिस्तान तटरक्षक दलाने अटक केल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना ऑक्टोबर 2022 मध्ये घडली होती. विनोद कोलला पाकिस्तानी न्यायालयाने सुनावलेली शिक्षा 17 नोव्हेंबर 2022 रोजी संपली होती, मात्र त्याची अद्यापही सुटका झाली नव्हती.

विनोद कोल याला 8 मार्च रोजी अंघोळ करत असताना अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर पाकिस्तानातील तुरुंगात रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र कारागृहातील इतर भारतीय कैद्यांना 17 मार्च रोजी त्याच्या मृत्यूची माहिती मिळाली. तुरुंग कर्मचाऱ्यांच्या मदतीने भारतीय कैद्यांनी गोरटपाडा येथील त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असल्याचे वृत्त आहे. विनोद कोल याच्या आजारपणाची आणि मृत्यूची माहिती भारतीय कौद्यांनी व्हॉट्सॲप मेसेजद्वारे त्याच्या कुटुंबीयांना दिली होती.

विनोदच्या कुटुंबीयांनी स्थानिक आमदाराशी साधला संपर्क (Vinod’s family approached the local MLA)

कुटुंबीयांना विनोदच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांनी स्थानिक आमदाराशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडे मदत मागितली. आमदाराने हा मुद्दा केंद्र सरकारकडे मांडला. त्यानंतर पाकिस्तानी समकक्षांशी यासंदर्भात चर्चा करण्यात आली. पाकिस्तानी प्रशासनाने विनोद कोलचा मृतदेह भारतात पाठवण्याचे मान्य केले आहे. जतीन देसाई हे पाकिस्तानातील कैद्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी सांगितले की, भारतीय कैद्याचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. यानंतर महाराष्ट्रातील कैद्यांच्या यादीत त्यांचे नाव आढळून आले. त्यानंतर आता विनोदचा मृतदेह 29 एप्रिल रोजी भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे.

35 मच्छिमारांची होणार सुटका (35 fishermen will be released)

दरम्यान, भारतीय सागरी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तान हद्दीत प्रवेश केल्यामुळे पाकिस्तानच्या कैदेत असणाऱ्या सुमारे 183 मच्छिमारांपैकी 35 मच्छिमारांची सुटका येत्या 30 एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती जतीन देसाई यांनी दिली. यातील पाच जण डहाणू तालुक्यातील आहेत. या सर्व मच्छिमारांना आधी गुजरातमधील वेरावळ येथे पाठवण्यात येईल. त्यानंतर ते डहाणूला येतील. त्यांना घरी आणण्याची व्यवस्था राज्य सरकारने करावी, अशी अपेक्षा जतीन देसाई यांनी व्यक्त केली आहे.

Edited By – Rohit Patil

First Published on: April 26, 2024 3:30 PM
Exit mobile version