पंकजा मुंडे, विनोद तावडेंचं अखेर पुनर्वसन, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश!

पंकजा मुंडे, विनोद तावडेंचं अखेर पुनर्वसन, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश!

गेल्या वर्षी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांपासून मेन स्ट्रीम राजकारणापासून काहीसे लांब झालेले भाजपचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि माजी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचं अखेर भाजपनं पुनर्वसन केलं आहे. आज जाहीर झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज भाजपच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यात विनोद तावडे आणि पंकजा मुंडे या दोघांचा समावेश होता. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं, तर पंकजा मुंडे यांचा बीडमध्ये पराभव झाला होता. त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. पंकजा मुंडे आणि विनोद तावडे या दोघांचाही राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांना इथेही हुलकावणीचा सामना करावा लागला आहे.

विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्यासोबतच राज्यातून विजया रहाटकर आणि सुनील देवधर यांचाही राष्ट्रीय सचिव म्हणून समावेश करण्यात आला आहे.

भाजपाची राज्यातील सत्ता गेल्याने आता पक्ष त्यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवतो याकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्या नेत्यांचे लक्ष लागले होते. मात्र राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी देत तावडे आणि पंकजा यांची थोडीफार नाराजी दूर करण्यात आली आहे. मात्र, त्याचवेळी खडसे यांना दूरच ठेवले आहे. गेल्या काही दिवसांतील फडणवीस यांच्यावर केलेली जोरदार टीका खडसे यांना भोवल्याचे बोलले जाते.सतत बाजूला करण्याच्या पक्षाच्या भूमिकेमुळे खडसे आता काय पाऊल उचलतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधील या नव्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधून राष्ट्रीय सहसरचटणीस म्हणून व्ही. सतीश, राष्ट्रीय सचिव म्हणून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून संजू वर्मा, हिना गावित आणि अल्पसंख्याक मोर्चासाठी जमाल सिद्दीकी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

याबरोबर विशेष उल्लेखनीय नियुक्त्यांमध्ये कर्नाटकमधील युवा खासदार तेजस्वी सूर्या यांची भाजपाच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच आयटी आणि सोशल मीडियाची जबाबदारी अमित मालवीय यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

First Published on: September 26, 2020 5:22 PM
Exit mobile version