Patanjali Ads Case: ‘तुमची जाहीरात तर माफीनाम्यापेक्षा मोठी असते; SCने बाबा रामदेव यांना पुन्हा फटकारलं

Patanjali Ads Case: ‘तुमची जाहीरात तर माफीनाम्यापेक्षा मोठी असते; SCने बाबा रामदेव यांना पुन्हा फटकारलं

नवी दिल्ली: पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने रामदेव यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल फटकारले. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने अनेक प्रश्न थेट बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना विचारले आणि पतंजलीने वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीवरही प्रश्न उपस्थित केले. आता या प्रकरणी 30 एप्रिल रोजी पुन्हा सुनावणी होणार असून, या सुनावणीदरम्यान स्वामी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनाही न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Patanjali Ads Case Your advertisement is bigger than your apology SC reprimands Baba Ramdev again)

इंडियन मेडिकल असोसिएशननं नोव्हेंबर 2023 मध्ये पतंजली आयुर्वेदाविरोधात केस दाखल केली होती. अ‌‌ॅलोपथी डॉक्टरांविरोधात जाणूनबुजून चुकीचे दावे पतंजलीनं आपल्या जाहिरातींमध्ये केले, असा आरोप IMA नं केला होता. याबाबत, पतंजलीनं तत्काळ सर्व जाहिराती थांबवाव्यात असे आदेश कोर्टाने फेब्रूवारीमध्ये दिले होते.

काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

तुम्ही केलेल्या जाहिरातीच्या आकाराएवढा हा माफीनामा आहे का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला. या जाहिरातींसाठी दहा लाखांचा खर्च आल्याची माहिती रोहतगी यांनी दिली असून जवळपास 67 वर्तमानपत्रात ही जाहीरात प्रसिद्ध झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पुढच्या सुनावणीत प्रसिद्ध झालेल्या माफीनाम्याचं कात्रण सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

प्रसिद्ध झालेल्या माफीनाम्याचे कात्रण कापा आणि हातात ठेवा. या कात्रणांची फोटोकॉपी मोठी केल्याने आम्ही प्रभावित होणार नाही. आम्हाला जाहिरातीचा खरा आकार पाहायचा आहे. जेव्हा तुम्ही माफीनामा छापता तेव्हा आम्ही मायक्रोस्कोपने पाहावा असा त्याचा अर्थ होत नाही, असं न्यायमूर्ती कोहली म्हणाल्या.

आतापर्यंत कोर्टात काय झालं?

सुप्रीम कोर्टात 10 एप्रिल रोजी जेव्हा खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती, तेव्हा खंडपीठाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची माफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर 16 एप्रिलच्या सुनावणीस दोघांनीही जाहीर माफी मागण्यास तयार असल्याचे सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दाखल केलेल्या नोटिशीला उत्तर देताना त्यांनी ही बिनशर्त माफी मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने रामदेवबाबांना विचारणा केली की तुम्हाला तुमचं काही म्हणणं मांडायचं आहे का? त्यावर वकील मुकुल रहतोगी म्हणाले की, आम्ही आता कुठलीही फाईल दाखल करणार नाही. तसंच रामदेवबाबा जाहीर माफी मागायलाही तयार आहेत. रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी जाहीर माफी मागावी आणि ती वृत्तपत्रात छापावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : नाशिकचा तिढा सुटता सुटेना; भुजबळ म्हणतात, राष्ट्रवादीचा दावा आजही कायम)

Edited By- Prajakta Parab 

First Published on: April 23, 2024 6:28 PM
Exit mobile version