Baba Ramdev : आम्ही माफी मागतो; पुन्हा असे होणार नाही, रामदेव बाबांचा पुन्हा एकदा माफीनामा

Baba Ramdev : आम्ही माफी मागतो; पुन्हा असे होणार नाही, रामदेव बाबांचा पुन्हा एकदा माफीनामा

नवी दिल्ली : योग गुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी पुन्हा एकदा सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. पतंजली आयुर्वेदाने केलेल्या भ्रामक जाहिरातींबद्दल त्यांनी ही माफी मागितली आहे. दरम्यान, माफी मागण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही. मंगळवारी देखील त्यांनी माफी मागितली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा माफीनामा फेटाळून लावला होता. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी 30 एप्रिल रोजी होणार असून यावेळी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना वैयक्तिकरित्या हजर राहण्यास सांगितले आहे. (patanjali ayurveda baba ramdev case in supreme court news achary balkrishna)

आजच्या जाहिरातीपूर्वी एक दिवस आधीच जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. मात्र, बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचे नाव त्यात नव्हते. त्यामुळेच या प्रकरणावरील सुनावणीत न्या. हिमा कोहली आणि न्या. ए. अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळेच लगेचच दुसऱ्या दिवशी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

बिनशर्त सार्वजनिक माफी या शीर्षकांतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयात सध्या (रिट याचिका 645/2022) या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी आमच्याकडून झालेल्या न्यायालयीन अवमान प्रकरणी आम्ही व्यक्तिगत तसेच सार्वजनिकरित्या माफी मागतो आहोत, असे या जाहिरातीत म्हटले आहे. 22 नोव्हेंबर 2023 च्या पत्रकार परिषदेसाठी आम्ही बिनशर्त माफी मागतो आहोत. जाहिरातींमध्ये प्रकाशित झालेल्या चुकांसाठी आम्ही माफी मागतो. अशा चुका पुन्हा होणार नाहीत, याची आम्ही खबरदारी घेऊ. इथून पुढे सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना तसेच आदेशांचे पालन अत्यंत गंभीरपणे करण्याचे आम्ही वचन देतो. तसेच आमच्याकडून न्यायालयाचा अवमान होणार नाही, कायद्याचे पालन होईल, हा विश्वास आम्ही देतो, असेही त्यांनी या जाहिरातीत म्हटले आहे.

माफीनामा जाहिरातींइतकाच हवा – सर्वोच्च न्यायालय (Apology should be as much as advertisement – Supreme Court)

एक दिवस आधीच प्रकाशित झालेल्या माफीनाम्यावरून सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. यात बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचे नाव नव्हते. या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने एक दिवस आधीच प्रकाशित झालेल्या जाहिरातीत बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचे नाव नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच ज्या आकारात जाहिरात होती, त्याच आकारात माफीनामा प्रसिद्ध केला का, असा सवालही उपस्थित केला. जाहिरातीप्रमाणेच माफीनाम्याचा फॉन्ट आणि साईझ होता का, अशी विचारणा न्या. कोहली यांनी केली.

Edited by : Ashwini A. Bhatavdekar

First Published on: April 24, 2024 5:09 PM
Exit mobile version