पेट्रोल- डिझेल दरवाढ ‘थांबता थांबेना’ !

पेट्रोल- डिझेल दरवाढ ‘थांबता थांबेना’ !

पेट्रोल १६ पैसे तर डिझेल १५ पैशांनी महागलं

पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ सलग सोळाव्या दिवशीही सुरूच आहे. देशभरात पेट्रोलच्या किंमती १६ पैसे तर डिझेलच्या किंमती १५ पैशांनी वाढल्या आहेत. १४ मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन बजेटवर पडत असतानाच आता वाहतूकदारांनीही दरवाढीचा निर्णय घेतला आहे. खासगी प्रवासी वाहतुकीत ३० मे, तर मालवाहतुकीत १ जूनपासून दरवाढ होणार आहे.

१५ दिवसांत किती वाढला दर?
पेट्रोलच्या दरांमध्ये १४ मेपासून सातत्याने वाढ होत आहे. म्हणजे १३ मे २०१८ ते २८ मे २०१८ या १५ दिवसांमध्ये ३ रुपये ८० पैसे इतकी वाढ पेट्रोलच्या दरात झाली आहे. १३ मे रोजी दिल्लीत पेट्रोलची किंमत ७४.६३ रुपये, तर मुंबईत ८२.२५ रुपये प्रति लिटर इतकी होती. ती आता दिल्लीत ७८.४३ रुपये, तर मुंबईत ८६.२४ इतकी झाली. गेल्या १५ दिवसांत दिल्लीत डिझेलचे दर ३ रुपये ३८ पैशांनी महागले. डिझेलच्या दरातही कमालीची वाढ झाली असून आज डिझेल दिल्लीत ६९.३१ रुपये तर मुंबईत ७३.७९ रुपये प्रति लिटर इतके दर झाले आहेत.

२० जुलैपासून देशव्यापी आंदोलन
दरवाढीचा फटका मालवाहतुकीला बसणार असल्याने आता पुन्हा एकदा जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळांसह अन्य महत्त्वाच्या वस्तूंची दरवाढ अपरिहार्य आहे. त्यातच या दरवाढीच्या मुद्यावरून मालवाहतूकदारांनी २० जुलैपासून देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने महागाईचा भडका आणखी उडणार आहे. डिझेलच्या दराने विक्रमी पल्ला गाठल्याने मालवाहतूकदार संकटात आले आहेत. त्यांना प्रति किमी दीड ते ३ रुपयांचे नुकसान सोसावे लागते. यामुळे त्यांनी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारकडे भाडेवाढ करू देण्याची मागणी केली आहे. कर्नाटक निवडणूक काळात १९ दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ सरकारी तेल कंपन्यांनी रोखून धरली होती, पण निवडणूक संपताच मागील सोळा दिवस हे दर सातत्याने वाढत आहेत. यामुळे वाहतूकदारांनी सरकारकडे तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पेट्रोलचे दर
दिल्ली – ७८.४३
मुंबई – ८६.२४
कोलकाता – ८१.०६
चेन्नई – ८१.४३

डिझेलचे दर
दिल्ली – ६९.३१
मुंबई – ७३.७९
कोलकाता – ७१.८६
चेन्नई – ७३.१८

First Published on: May 29, 2018 6:22 AM
Exit mobile version