पेट्रोल-डिझेलचा भडका सुरुच

पेट्रोल-डिझेलचा भडका सुरुच

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र सुरुच आहे. दरवाढ कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. सलग सहव्या दिवशी वाढ झाल्यामुळे जनता आणखी त्रस्त झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात १० पैशांनी वाढ झाली तर डिझेलच्या दरामध्ये २७ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोल ८२.३६ रुपये प्रतिलिटर दराने तर डिझेल ७४.६२ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. दिल्लीसोबतच मुंबईमध्ये देखील पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरामध्ये ९ पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरामध्ये ३१ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ८७.८२ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे तर डिझेलमध्ये २९ पैशांनी वाढ झाल्यामुळे मुंबईत डिझेल ७८.२२ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे.

सणासुधीच्या काळात दरवाढ सुरुच

गेल्या महिनाभर पेट्रोल आणि डिझेलचे दरात सातत्याने वाढ होत होती. त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी करण्याचा निर्णय घेतला. तरी देखील पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरु आहे. मागच्या महिन्यात गणेशोत्सव महागाईत गेला. तर आता नवरात्र आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेली दिवाळी देखील महागाईत जाणार का असा प्रश्न सर्वसामान्य जनते पुढे पडला आहे. सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.

पेट्रोल-डिझेल दर केले होते कमी

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मागच्या आठवड्यात इंधनाचे दर २.५० रुपयांनी कमी करण्याची घोषणा करत जनतेला दिलासा दिला होता. त्यानंतर अनेक राज्यामध्ये सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. देशभरामध्ये इंधनाचे दर २.५० रुपये ते ५ रुपयापर्यंत कमी करण्यात आले होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला होता. या घोषणेनंतर दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली नाही. मात्र त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र सुरु झाले. दरवाढीचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे.

First Published on: October 11, 2018 12:00 PM
Exit mobile version