राम मंदिर उडवण्यासाठी PFIचा कट, NIA ने तिघांना घेतले ताब्यात

राम मंदिर उडवण्यासाठी PFIचा कट, NIA ने तिघांना घेतले ताब्यात

अयोध्या – गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) उडवून टाकण्याच्या अनेक धमक्या प्राप्त होत आहेत. कधी फोनवरून, कधी सोशल मीडियावरून तर कधी इमेलच्या माध्यमातून बॉम्ब स्फोटाची धमकी देण्यात येत आहे. याप्रकरणी सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने (National Investigation Agency) बिहार पोलिसांच्या मदतीने शनिवारी अयोध्येतील राम मंदिर उडवण्याच्या कटाच्या आरोपाखाली तीन PFI (Popular Front of India) सदस्यांना मोतिहारी येथून ताब्यात घेतले. यामध्ये रियाझ मारूफचाही समावेश आहे, ज्याचे नाव दहशतवादी फंडिंगमध्येही होते.

हेही वाचा – अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचं सावट; गुप्तचर यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा

प्रभू राम व सितेची मूर्ती साकारण्यासाठी नेपाळ येथील शिळा गुरुवारी राम मंदिर ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह होता. मात्र तेव्हाच मनोज कुमार नामक व्यक्तीला राम मंदिर उडवून देण्याची धमकी मिळाली. मनोज कुमार यांनी धमकीच्या फोनची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात याची तक्रार नोंदवून घेत हा फोन कोणी केला, फोन कुठून आला. याची चौकशी सुरू करण्यात आली. तसेच, गुप्तचर यंत्रणांनीही समांतर तपासणी सुरू केली होती. त्यानुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेने तीन PFI सदस्यांना मोतिहारी येथून ताब्यात घेतले.

सप्टेंबर महिन्यात देशभरात एकाचवेळी पहाटेच्या सुमारास दहशतवादविरोधी पथक व एनआयएच्या माध्यमातून छापेमारी करत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या संशयित सदस्य व पदाधिकार्‍यांची धरपकड केली होती. दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा, आयसीससारख्या दहशतवादी संघटनेशी संबंध, देशविघातक कृत्यात सहभाग अशा अनेक कारणांवरून केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि तिच्या सहयोगी संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे.

डीजी हेडक्वार्टर जितेंद्र सिंह गंगवार म्हणाले, शालिग्राम शिला नेपाळमधून अयोध्येला नेत असताना राम मंदिर उडवण्याच्या धमकीचा आणि कटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी एनआयएने ही कारवाई केली आहे.

गेल्या वर्षी 350 हून अधिक अटक

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गृह मंत्रालयाने पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संघटनांवर दहशतवादी गटांशी संबंध ठेवल्याबद्दल आणि विध्वंसक कारवायांमध्ये गुंतल्याबद्दल पाच वर्षांसाठी बंदी घातली होती. NIA ने गेल्या वर्षी PFI शी संबंधित 350 लोकांना देशाच्या विविध भागातून अटक केली आहे.

हल्ल्याचं सावट कायम

गुप्तचर यंत्रणांनी जानेवारी महिन्यात दिलेल्या माहितीनुसार, आत्मघातकी बॉम्बच्या माध्यमातून राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचला जात आहे. तसेच, ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याचा कट रचल्याचे सांगितले जात असून, दहशतवादी नेपाळमार्गे भारतात आत्मघातकी हल्ल्याची योजना आखत आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क आणि सजक राहिले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले आहे.

First Published on: February 5, 2023 8:49 AM
Exit mobile version