‘कृष्णासारखी बासरी वाजवली, तर गाय जास्त दूध देते!’

‘कृष्णासारखी बासरी वाजवली, तर गाय जास्त दूध देते!’

दिलीपकुमार पॉल

ग्रामीण भागामध्ये पूर्वी प्रत्येक घरात गाय असायची. गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रमाण कमी झालं आहे. पण गायीचं दूध हा अनेक घरांसाठी जोडधंदाच असतो. आता याच व्यवसायाची भरभराट करणारा एक अजब उपाय भाजपचे आसाममधले आमदार दिलीपकुमार पॉल यांनी सांगितला आहे. ‘कृष्णासारखी बासरी वाजवली, तर गाय जास्त दूध देते’, असा भन्नाट शोध पॉल साहेबांनी लावला आहे. बराक व्हॅलीमधल्या सिल्चरमधून दिलीप पॉल निवडून आले आहेत. एका स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अतिथी भाषण करताना त्यांनी हा सल्ला दिला आहे. एवढंच नव्हे, तर त्याला शास्त्रीय आधार असल्याचा देखील दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाले पॉल?

या कार्यक्रमात बोलताना दिलीपकुमार पॉल म्हणाले, ‘संगीत आणि नृत्याचे अनेक सकारात्मक परिणाम आहेत. गायीला देखील आपण एखादं शांत संगीत ऐकवलं किंवा कृष्ण वाजवायचा तशी बासरी वाजवून दाखवली, तर दूध उत्पादन वाढतं. याशिवाय परदेशी जातीच्या गायींपेक्षा भारतीय गायींचं दूध हे अधिक पौष्टिक आणि चविष्ट असतं. भारतीय गायींच्या दुधापासून बनवलेले चीज, बटर असे दुग्धजन्य पदार्थ देखील परदेशी जातीच्या गायीच्या दुधापेक्षा जास्त दर्जेदार असतात.’


हेही वाचा – अजबच! मुंबईत पिन न टाकताच ATMमधून आले ९६ हजार रुपये!

काय म्हणतं विज्ञान?

जेव्हा पॉल यांना त्यांच्या दाव्यातल्या रिसर्चबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी गुजरातमधल्या एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या संशोधनाबद्दल सांगितलं. ‘गुजरातमधल्या एका संस्थेने काही वर्षांपूर्वी यासंदर्भात संशोधन केलं होतं. यामध्ये बासरीचं संगीत आणि गायीचं दूध उत्पादन यांचा संबंध सिद्ध झाला होता’, असं ते म्हणाले. वास्तविक युनिव्हर्सिटी ऑफ लॅसेस्टरमध्ये २००१साली झालेल्या एका संशोधनात आवाजी संगीतापेक्षा शांत संगीतामुळे गायीच्या दुधाचं उत्पादन अधिक होतं, हे दिसून आलं आहे.

First Published on: August 27, 2019 3:34 PM
Exit mobile version