मोदींनी मला धडा शिकवला – राहुल गांधी

मोदींनी मला धडा शिकवला – राहुल गांधी

होय, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला धडा शिकवला अशी स्पष्ट कबुली काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव केल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही कबुली दिली आहे. २०१४ची निवडणूक माझ्यासाठी आत्तापर्यंत सर्वात चांगली गोष्ट ठरली आहे. होय, कारण या निवडणुकीमधून मी खूप काही शिकलो. विचार कसा करावा हे २०१४च्या निवडणुकीनं मला शिकवलं. देश आणि देशातील जनता महान आहे. राजकारणी म्हणून जनतेला काय वाटतं हे तुम्हाला कळायला पाहिजे. मोदींमुळे मला काय करू नये हे समजलं. २०१४ साली जनतेनं मोठ्या प्रमाणावर मोदींना पाठिंबा दिला. पण देशातील जनतेच्या मनात काय आहे हे ऐकण्यास मोदींनी स्पष्ट नकार दिला. देशातील तरूण वर्गाचं म्हणणं मोदींनी केव्हाच ऐकलं नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या नाहीत. त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण झाला. राजकारणात अहंकार निर्माण होणं म्हणजे घातक. देशातील जनता शिक्षक आहे. मोदींच्या वागण्यातून मी खूप शिकलो.

२०१९ साली आम्ही भाजपला हरवणार. मात्र कुणाला संपवण्याची भाषा आम्ही करणार नाही असा टोला देखील यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या हेच आमचे प्रमुख मुद्दे आहेत. शिवाय राफेल करार, नोटाबंदी आणि जीएसटी हे देखील प्रचारातील प्रमुख मुद्दे असतील. काँग्रेसनं निवडणुका जिंकल्या म्हणून ई्व्हीएमच्या प्रश्न सुटत नाही असं देखील यावेळी राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केलं. मोदी भ्रष्टाचाराविरोधात लढतील असं जनतेला वाटत होतं. पण, मोदी स्वतःच भ्रष्ट आहेत असं जनतेला वाटत आहे. राफेलमध्ये भ्रष्टाचार झाला हे खरं आहे. ते सत्य देखील समोर येईल. देशातील प्रश्न जैसे थे आहेत.  शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे तिन्ही प्रश्न सोडवण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. शिवाय, नोटाबंदी, जीएसटी या संदर्भातले निर्णय जनतेला पटलेले नाहीत. पाच राज्यांमध्ये जनतेचा रोषच मतपेटीतून व्यक्त झाला आहे असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

First Published on: December 12, 2018 9:10 AM
Exit mobile version