पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींचा ताफा अडवला

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींचा ताफा अडवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी पंजाबमधील फिरोजपूर येथे होणारी सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. पंजाबमधील हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे 30 किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवला. त्यामुळे कार्यक्रमस्थळी जाणार्‍या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर सुमारे 15 ते 20 मिनिटे अडकून पडला होता.

पंतप्रधान मोदी बुधवारी सकाळी भटींडाला पोहोचले. त्यानंतर तिथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु, पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे पंतप्रधान मोदींना सुमारे 20 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली होती. हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. ह्या रस्त्याचा प्रवास तब्बल 2 तासांचा होता. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे 30 किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला. तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. त्यामुळे पंतप्रधान मोदींना 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून राहावे लागले.

मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो – मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा फ्लायओव्हर अडकल्यानंतर त्यांनी दौरा रद्द करत पुन्हा ते भटिंडा विमानतळावर पोहोचले. यावेळी मोदींनी प्रतिक्रिया देताना पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मोदींनी तिथल्या कर्मचार्‍यांना, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, की मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.

सुरक्षिततेत कुठलीही त्रुटी नव्हती – चरणजीतसिंग चन्नी, पंजाब मुख्यमंत्री
पंतप्रधानांचा ताफा अडकल्यानंतर भाजपकडून पंजाबमधील काँग्रेसशासित सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधानांच्याच सुरक्षेत कसूर ठेवल्याचा आरोप केंद्र सरकारने पंजाब सरकारवर केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकारावर पंजाब सरकारकडे खुलासा देखील मागितला आहे. यासंदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांच्या जीवाला धोका असता तर आधी मी माझे रक्त सांडले असते. आम्ही आमच्या पंतप्रधानांवर कुठलेही संकट येऊ देणार नाही. यात बिनकामाचे राजकारण करू नये. सुरक्षिततेत कुठलीही त्रुटी नव्हती. पंतप्रधानांनी शेवटच्या क्षणी गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. ते हेलिकॉप्टरने जाणार असल्याचे नियोजन होते, असे चन्नी म्हणाले.

काँग्रेसचे खुनी हेतू अयशस्वी ठरले – स्मृती इराणी
पंतप्रधान मोदींचा ताफा अडवण्यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उचलत काँग्रेसवर गंभीर आरोप केले. भारताच्या इतिहासात पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खुनी इरादे अयशस्वी ठरले. काँग्रेसमधील जे लोक मोदींचा द्वेष करतात, ते आज देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या सुरक्षेला कशाप्रकारे भंग करता येईल, यासाठी प्रयत्नशील होते, अशी प्रतिक्रिया स्मृती इराणी यांनी दिली.

…तर रिकाम्या खुर्च्यांमुळे मोदींनी सभा रद्द केली – सुरजेवाला
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पंजाब सरकार आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. नड्डांच्या टीकेला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एक व्हिडिओ ट्विट करत उत्तर दिले. पंतप्रधान मोदी यांची रॅली रद्द होण्यामागे मुख्य कारण हे रिकाम्या खुर्च्या होते. विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ बघा. अर्थहीन भाषणबाजी नको. शेतकरी विरोधी मानसिकतेचे सत्य स्विकारा आणि आत्मचिंतन करा. पंजाबमधील जनतेने रॅलीपासून दूर राहत अहंकारी सत्तेला आरसा दाखवला आहे, अशा शब्दात सुरजेवाला यांनी उत्तर दिले.

First Published on: January 6, 2022 6:00 AM
Exit mobile version