पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन यांच्यात बैठक, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन यांच्यात बैठक, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. बैठकीत कोरोनासह दोन्ही देशांमधील संबंधांसह विविध विषयांवर चर्चा झाली. भारत आणि अमेरिकेसाठी हे दशक अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, असं पंतप्रधान मोदींनी जो बायडेन यांना सांगितलं. तीन दिवसांच्या अमेरिकी दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारी दुसरा दिवस आहे.

राष्ट्रपती झाल्यानंतर पहिल्यांदाच बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची समोरासमोर भेट झाली आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. शानदार स्वागत केल्याबद्दल तुमचा आभारी आहे. यापूर्वीही आपल्याला चर्चा करण्याची संधी मिळाली होती आणि भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांसाठी तुम्ही तुमचा दृष्टीकोन मांडला होता. आज तुम्ही आपल्या द्वीपक्षीय संबंधाबद्दल तुमचं व्हिजन आणण्यासाठी पुढाकार घेत आहात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पुढे बोलताना मोदी यांनी भारत आणि अमेरिका मिळून सर्वात मोठी आव्हाने पार करू शकतो, असा विशअवा व्यक्त केला. दोन्ही देशांच्या परंपरा आणि लोकशाही जगासाठी एक उदाहरण आहेत. बायडेन यांची दृष्टी आमच्यासाठी प्रेरणा देणारी आहे. आज अमेरिकेत ४० लाख भारतीय राहतात जे अमेरिकेला बळकट करण्यासाठी मदत करत आहेत. आम्हाला दोन्ही देशांमधील लोकांमधील संपर्क आणखी वाढवायचा आहे, असं मोदी म्हणाले.

मला भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधात मोठा बदल दिसतो. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापाराला स्वतःचे महत्त्व आहे. या दशकात देखील आम्ही एकमेकांना व्यापार क्षेत्रात खूप मदत करू शकतो. अमेरिकेकडे भारताला आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी आहेत. भारताकडे अनेक गोष्टी आहेत ज्या अमेरिकेसाठी उपयुक्त ठरू शकतात, असं मोदी म्हणाले.

अमेरिका-भारत संबंध अनेक जागतिक आव्हानांना तोंड देण्यास मदत करू शकतात, यावर आपला दीर्घ काळापासून विश्वास आहे. खरं तर २००६ मध्ये उपराष्ट्रपती होतो, तेव्हा मी म्हटलं होतं की २०२० पर्यंत भारत आणि अमेरिकेत जगातील सर्वात चांगली मैत्री असेल, असं अमेरिकेचे अध्यक्ष बायडन म्हणाले.

काही वेळापूर्वीच पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यातील बैठक संपली आहे. पंतप्रधान मोदी हे व्हाइट हाउसमधून निघाले आहेत. आता ते क्वाड देशांसोबतच्या बैठकीत सहभागी होतील. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी व्हाइट हाउसमध्ये रुझवेल्ट रूमध्ये व्हिजिटर बुकमध्ये स्वाक्षरी केली.

 

First Published on: September 24, 2021 10:55 PM
Exit mobile version