Corona:५ एप्रिलला रात्री ९ वाजता तुमची ९ मिनिटं मला द्या! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Corona:५ एप्रिलला रात्री ९ वाजता तुमची ९ मिनिटं मला द्या! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानवर आरोप

देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून या पार्श्वभूमीवर अजूनही अनेक ठिकाणी लोकं बेजबाबदारपणे बाहेर फिरताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे अनेक ठिकाणी लोकांमध्ये असुरक्षिततेची आणि एकटेपणाची जाणीव निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘आपण सगळे एकच आहोत आणि ते दाखवण्यासाठी येत्या रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता तुमची ९ मिनिटं मला हवी आहेत’ असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. आज सकाळी ९ वाजता नरेंद्र मोदींनी देशवासियांशी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला. या व्हिडिओमध्ये त्यांनी  देशवासियांना आवाहन केलं आहे.

काय केलं आवाहन?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी आवाहन करताना म्हणाले, ‘कोरोनामुळे जो अंधकार निर्माण झालाय, त्याला हरवून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे. त्यामुळे या रविवारी ५ एप्रिलला आपल्या सगळ्यांना मिळून कोरोनाला आव्हान द्यायचं आहे. ५ एप्रिलला आपल्याला देशवासियांच्या महाशक्तीचं जागरण करायचं आहे. ५ एप्रिलला रविवारी रात्री ९ वाजता मला तुम्हा सगळ्यांचे ९ मिनिट हवे आहेत. तेव्हा घरातल्या लाईट बंद करून घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीमध्ये उभं राहून मेणबत्ती, दिवा, टॉर्च, मोबाईलचा फ्लॅश ९ मिनिटं लावा. तेव्हा घरातल्या लाईट बंद कराल, सगळीकडे जेव्हा प्रत्येकजण एकेक दिवा लावेल तेव्हा आपली महाशक्ती दिसून येईल. यातून दिसून येईल की आपण कुणीही एकटे नाहीत’. ‘माझी विनंती आहे की यावेळी कुणालाही कुठेही एकत्र जमायचं नाही. रस्त्यावर, बाहेर जायचं नाहीये. घराचा दरवाजा किंवा बाल्कनीतूनच हे करायचं आहे’, असं देखील मोदींनी यावेळी आवर्जून सांगितलं.

१३० कोटी देशवासियांची सामुहिक शक्ती!

दरम्यान, कोरोनाविरोधातल्या या लढ्यात कुणीही स्वत:ला एकटं समजू नये, असं देखील मोदी यावेळी म्हणाले. ‘कोरोनाच्या लॉकडाऊनला आज ९ दिवस होत आहेत. यादरम्यान तुम्ही सगळ्यांनी शिस्त आणि सेवाभाव दाखवला आहे. तो अभूतपूर्व आहे. शासन, प्रशासन आणि जनतेने मिळून या परिस्थितीला सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. २२ मार्च रोजी  कोरोनाविरोधात लढणाऱ्या प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या. तो सगळ्या देशांसाठी आदर्श ठरला आहे. कोट्यवधी लोकं घरांमध्ये आहेत. कुणालाही वाटेल की मी एकटा हा लढा कसा लढू शकतो. किती दिवस असे अजून काढावे लागतील? असा प्रश्न देखील पडत असेल. पण आपल्यापैकी कुणीही एकटा नाही. १३० कोटी देशवासियांची सामुहिक शक्ती प्रत्येकाच्या सोबत  आहे’, असं त्यांनी नमूद केलं.

First Published on: April 3, 2020 9:21 AM
Exit mobile version