… विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत, पंतप्रधानांनी दिल्या आषाढीच्या मराठमोळ्या शुभेच्छा!

… विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत, पंतप्रधानांनी दिल्या आषाढीच्या मराठमोळ्या शुभेच्छा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी

दरवर्षी लाखोंचा वारकरी जन समुदाय हा पंढरपूरात माऊलीचा आशीर्वाद घेण्यासाठी पायी वारी करत दाखल होत असतो. मात्र सालाबादाप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी साजरी होत आहे पण प्रशासनाच्या नियमांचे पालन करत… कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच कोरोनाचा संसर्ग टाळावा यासाठी एकत्र न येण्याचे आवाहन केले गेले आहे.

मराठमोळ्या अंदाजात मोदींच्या शुभेच्छा

दरवर्षी प्रमाणे उत्साहात होणारी वारी, रिंगण, टाळ-मृदूगांचा आवाज, भजनासह हरी नामाचा जयघोष मात्र फारसा दिसला नाही. असे असले तरी प्रत्येकजण घरात सुरक्षित राहून आपल्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत आहे आणि कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर करण्याची प्रार्थना करत आहे.  दरम्यान आषाढी एकदशीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकरी परंपरेच्या आठवणींसह इतिहासाला उजाळा दिला आहे. विशेष म्हणजे जय जय पांडुरंग हरी म्हणत पंतप्रधान मोदी यांनी मराठमोळ्या अंदाजात सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“आषाढी एकादशी म्हणजे वारकरी परंपरेचे स्मरण करण्याचा दिवस. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम आणि इतर अनेक संत ज्यांनी समानता आणि सामाजिक सलोखा यांची शिकवण देत आपल्याला सदैव प्रेरणा दिली, अशा सर्व संतांना नमन, असे एक ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.”

तसेच, “आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा.विठ्ठलाच्या आशीर्वादाने गरीब आणि वंचितांना उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो. आपले जग आनंदी आणि आरोग्यदायी रहावे, या आपल्या निर्धाराला विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. जय जय पांडुरंग हरी”, असे ट्विट करत मोदी यांनी आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्र्यांचं साकडं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाला साकडे देखील घातले आहे.

कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.


Photos: विठ्ठल-रुक्मिणीचं डोळ्यांचं पारणं फेडणारं रुप

First Published on: July 1, 2020 3:22 PM
Exit mobile version