पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवली!

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवली!

गेल्या आठवड्याभरापासून देशात कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर देशात अनलॉक १ सुरू असताना नियम पुन्हा कडक करण्याची गरज व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशवासीयांना संबोधन केलं. यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारची भूमिका मांडली.

आपण कोरोनाशी लढता लढता अनलॉक २मध्ये प्रवेश करत आहोत. या काळात सर्दी, ताप वाढू शकतो. या काळात माझी देशवासियांना विनंती आहे की तुम्ही काळजी घ्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी


जेव्हापासून देशात अनलॉक सुरू झालं आहे, तेव्हापासून लोकांमध्ये बेजबाबदारपणा वाढला आहे. सुरुवातीला आपण मास्क, सामाजिक अंतर, २० सेकंद हात धुण्याविषयी फार सतर्क होतो. पण आज जेव्हा आपल्याला जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे, त्या वेळी बेजबाबदारपणा वाढणं चिंतेचा विषय आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी


लॉकडाऊनच्या दरम्यान गांभीर्याने नियमांचं पालन केलं गेलं. आता सगळ्यांना पुन्हा त्याच प्रकारची सतर्कता दाखवण्याची गरज आहे. विशेषत: कंटेनमेंट झोनमध्ये आपल्याला फार काळजी घ्यावी लागेल. जे नियमांचं पालन करत नाहीये, त्यांना आपल्याला थांबवावं लागेल आणि समजवावं लागेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी


हे १३० कोटी देशवासियांना वाचवण्याचं अभियान आहे. भारतात कुणीही नियमांपेक्षा वर नाही. लॉकडाऊनच्या दरम्यान देशाची सर्वोच्च प्राथमिकता होती की कोणत्याही गरीबाच्या घरी उपाशी राहण्याची वेळ येऊ नये. या काळात सगळ्यांनी प्रयत्न केले की इतक्या मोठ्या देशात आपला कुणीही भाऊ-बहीण उपाशी राहणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी


गेल्या ३ दिवसांत देशवासियांच्या खात्यांमध्ये ३१ हजार कोटी जमा केले गेले. शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी जमा झाले. ग्रामीण भागात प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू करण्यात आलं आहे. यावर सरकारकडून ५० हजार कोटींचा खर्च केला जात आहे. कोरोनाच्या काळात भारताच्या ८० कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना मोफत धान्य दिलं गेलं. याशिवाय, प्रत्येक कुटुंबाला महिल्याना १ किलो डाळ देखील दिली गेली. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या अडीच पट, ब्रिटनच्या लोकसंख्येच्या १२ पट आणि युरोपियन युनियनच्या लोकसंख्येच्या दुप्पट लोकांना आपल्या सरकारने मोफत अन्नधान्य दिलं. – पंतप्रधान नरेंद्र मोदी


आपल्याकडे पावसाळ्यात शेती क्षेत्रात जास्त काम असतं. इतर क्षेत्रांमध्ये जरा सुस्ती असते. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनांचा विस्तार दिवाळी आणि छटपूजेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत केला जाईल. म्हणजे ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देणारी ही योजना आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये देखील लागू राहील. सरकारकडून या ५ महिन्यांसाठी ८० कोटींपेक्षा जास्त लोकांना प्रत्येक महिन्याला ५ किलो गहू किंवा ५ किलो तांदूळ मोफत दिले जातील. त्यासोबतच प्रत्येक महिन्याला १ किलो चना मोफत दिला जाईल. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या विस्तारासाठी ९० हजार कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे. मागच्या योजनांचा खर्च मिळवला तर ही रक्कम तब्बल १.५ लाख कोटींपर्यंत जाते – पंतप्रधान नरेंद्र मोदी

First Published on: June 30, 2020 4:02 PM
Exit mobile version