विस्तारवादाचा काळ गेला…; पंतप्रधान मोदींचा चीनला इशारा

विस्तारवादाचा काळ गेला…; पंतप्रधान मोदींचा चीनला इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर लेहचा दौरा केला. यावेळी जवानांशी संवाद साधताना मोदींनी चीनला थेट इशारा दिला. गेल्या काही काळात विस्तारवादानंच मानवतेचा विनाश केला आहे. आता विस्तारवादाचं युग संपलं असून जग विकासाकडे वाटचाल करत आहे, असं म्हणत पंतप्रधानांनी चीनला इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अचानक लडाख जवळील निमू भागाचा दौरा करत सैनिकांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी जवानांशी संवाद साधत त्यांचं मनोबलही वाढवलं.

भारताने कायमच मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केलं आहे, आपलं आयुष्य वेचलं आहे. संपूर्ण जगानं आपल्या जवानांचा पराक्रम पाहिला आहे. गेल्या काही काळात विस्तारवादानेच मानवतेचा विनाश केला आहे. आता विस्तारवादाचं युग संपलं असून जग विकासाकडे वाटचाल करत आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला दिला. कोणाच्या डोक्यात जर विस्तारवादाची जिद्द असेल तर ते नेहमीच विश्वशांतीपुढे एक संकट ठरते, अशा शब्दात मोदींनी चीनला सुनावलं.

जवानांचं मनोबल वाढवताना पंतप्रधान मोदी म्हणाले, तुमचं शौर्य, भारतमातेच्या रक्षणासाठी तुम्ही करत असलेलं समर्पण हे अतुलनीय आहे. तुम्ही ज्या कठीण काळात आणि ज्या उंच ठिकाणी भारतमातेची ढाल बनून उभे आहात त्याची तुलना जगातल्या कशाचीच होऊ शकत नाही. तुमचं साहस, तुमचं शौर्य हिमालयातील पर्वतरांगांपेक्षा मोठं आहे. तुमचे बाहू इथल्या पर्वतरांगांसारखेच बळकट आहेत. तुमची इच्छाशक्तीही अटळ आहे, मी हा सगळा अनुभव घेतो आहे. त्याचंच प्रतिबिंब माझ्या भाषणात शब्दरुपाने उतरलं आहे, असं म्हणत त्यांनी जवानांचं मनोबल बाढवण्याचा प्रयत्न केला. तसंच सीमाभागात पायाभूत सुविधांसाठी पूर्वीपेक्षा तीन पट अधिक खर्च करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. जेव्हा जेव्हा देशाच्या रक्षणाशी संबंधित निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा मी सर्वप्रथम मातांचे स्मरण करतो. पहिली माता आमची भारत माता आहेत आणि दुसरी त्या वीरमाता ज्यांनी सैनिकांना जन्म दिला, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी सैनिकांचा गौरव केला.


हेही वाचा – PM Modi Leh Visit : मोदींनी जवानांशी साधला संवाद, थेट चीनला दिला इशारा!


 

First Published on: July 3, 2020 4:35 PM
Exit mobile version