शेतकरी आंदोलनामागे राजकीय पक्षांचा हात; नवनीत राणांचा आरोप

शेतकरी आंदोलनामागे राजकीय पक्षांचा हात; नवनीत राणांचा आरोप

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरयाणासह शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपच्या काही नेत्यांनी खलिस्तान म्हटले. तसेच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तर शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त विधान केले. दरम्यान, आता खासदार नवनीत राणा यांनी देखील शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे. नवनीत राणा यांनी शेतकरी आंदोलनामागे राजकीय पक्षांचा हात असल्याचा आरोप केला आहे. शिवाय, त्यांनी हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी शांत आहे, म्हणजे त्यांना हा कायदा आवडतोय, असा दावा नवनीत राणा यांनी केला.

नवनीत राणा यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना काही राजकीय पक्षांवर आरोप केले आहेत. काही राजकीय नेते आणि राजकीय पक्ष शेतकऱ्यांना समोर करून, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला निशणा साधत आहेत, असा आरोप नवनीत राणा यांनी केला. जर कृषी कायद्यांवर बोलायचे झाल्यास, महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ या राज्यांमध्ये शेतकरी या कायद्यांचे चांगले स्वागत करतोय. जर महाराष्ट्रातील शेतकरी शांत बसलेत, तर त्यांना हा कायदा आवडतोय. शेतकऱ्यांना या कायद्यातून स्वातंत्र्य दिले आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरीच आहेत. मात्र, त्यांना प्रोत्साहन देणारे, त्यांच्या मागे जे आहेत, ते काही राजकीय पक्ष आहेत. एवढे मोठे आंदोलन करणे शेतकऱ्यांच्या मनात नव्हते, मात्र राजकीय पक्षांमुळे एवढे मोठे आंदोलन झाले, असे नवनीत राणा म्हणाल्या.

यावेळी नवनीत राणा यांनी रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला. आपण एक जबाबदार व्यक्ती असताना, लोकप्रतिनिधी असताना शेतकऱ्यांबाबत असे वक्तव्य करायला नको. चीन-पाकिस्तानबाबत तुलना मन दुखावणारी आहे, अशा शब्दात निषेध केला. पुढे, त्यांनी कुठल्यातरी पक्षावर निशाणा केला असेल, पण चुकीने शेतकऱ्यांवर बोलले असतील, असे बोलत दानवेंची बाजू घेत शेतकऱ्यांची भावना आपण कधीच दुखावली नाही पाहिजे, असे राणा म्हणाल्या.

 

First Published on: December 11, 2020 8:56 AM
Exit mobile version