संघाच्या कार्यक्रमाला मुखर्जींनी उपस्थित राहणे गैर नाही – शिंदे

संघाच्या कार्यक्रमाला मुखर्जींनी उपस्थित राहणे गैर नाही – शिंदे

प्रणव मुखर्जी, माजी राष्ट्रपती ( फोटो सौजन्य- news18.com )

प्रणव मुखर्जींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यात काहीच गैर नसल्याचे मत काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे. प्रणव मुखर्जी हे धर्मनिरपेक्ष आणि विचारवंत असल्याचे देखील यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले. शिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील प्रणव मुखर्जी यांची शिकवण लक्षात घ्यावी असे देखील शिंदे यांनी म्हटले आहे.

७ जुनला संघाच्या शिक्षा वर्गाच्या समारोपाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. यावेळी स्वयंसेवकांना संबोधित करण्यासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना संघाने आमंत्रित केले आहे. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आमंत्रण स्वीकारल्यानंतर काँग्रेससह डाव्या पक्षांनी नाराजी व्यक्त केली. यावर बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र प्रणव मुखर्जींनी संघाच्या कार्यक्रमाला जाण्यास काहीच चुकीचे नसल्याचे मत व्यक्त करत मुखर्जी यांचे समर्थन केले आहे. तसेच प्रणव मुखर्जी यांचे विचार संघ आणि संघाच्या कार्यकर्त्यांना उपयुक्त ठरतील, असे देखील सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले प्रणव मुखर्जी?

मला जे बोलायचे आहे ते मी नागपूरमध्ये बोलेन, असे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारल्यानंतर प्रणव मुखर्जींविरोधात काँग्रेससह डाव्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर प्रणव मुखर्जी यांनी अखेर मौन सोडले आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यावरून आपल्याला अनेकांनी फोन केले, पत्रे पाठवली पण, आपण कुणालाही उत्तर दिले नसल्याचे देखील प्रणव मुखर्जी यांनी सांगितले. दरम्यान, नागपुरमधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी काय बोलतात याकडे आता सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

First Published on: June 4, 2018 2:51 AM
Exit mobile version