वाजपेयींच्या तैलचित्राचे संसदेत अनावरण!

वाजपेयींच्या तैलचित्राचे संसदेत अनावरण!

सौजन्य - लोकसभी टीव्ही

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज संसद भवनात दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहीरी वाजपेयी यांच्या तैलचित्राचे अनावरण केले. ‘माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या सन्मानार्थ, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करतील’, अशी घोषणा संसदेच्या एका अधिकाऱ्याने सोमवारीच केली होती. वाजपेयी यांच्या तैलचित्र अनावरणाच्या प्रसंगी उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध दलाचे अधिकारी तसंच अन्य काही नेते सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित होते.

वाजपेयी यांचे तैलचित्र कधी अनावरित करण्यात येईल याची तारीख, पोट्रेट समितीच्या अध्यक्षा आणि संसदेच्या स्पीकर सुमित्रा महाजन यांनी ७ फेब्रुवारीलाच निश्चीत केली होती. त्यामुळे तेव्हापासूनच वाजपेयी यांच्या तैलचित्राविषयी चर्चा आणि उत्सुकता होती. चित्रकार कृष्ण कन्हाई यांनी वाजपेयींचे हे रेखीव तैलचित्रं साकारलं आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर संसद भवनामध्ये त्यांचे तैलचित्र लावण्याची मागणी करण्यात आली होती. मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पोट्रेट समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. सदर बैठकीमध्ये गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि ग्रामीण विकास मंत्री नरेन्द्र सिंह तोमर यांनी संघटितपणे तैलचित्राची मागणी केली होती. या बैठकीला लोकसभा उपाध्यक्ष एम थंबीदुरै, गृहमंत्री राजनाथ सिंह, संसदीय कार्य मंत्री तोमर, कांग्रेसचे एम. सुदीप बंद्योपाध्याय, तेलंगाणा राष्ट्र समितिचे ए पी जितेन्द्र रेड्डी तसंच शिवसेना नेते आणि केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते उपस्थित होते. या सर्व नेत्यांच्या अनुमोदनानंतरच तैलचित्र लावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

First Published on: February 12, 2019 11:02 AM
Exit mobile version