पंतप्रधान मोदींना फिजी-पापुआ न्यू गिनीचा सर्वोच्च सन्मान, जागतिक नेतृत्वासाठी गौरव

पंतप्रधान मोदींना फिजी-पापुआ न्यू गिनीचा सर्वोच्च सन्मान, जागतिक नेतृत्वासाठी गौरव

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना फिजी-पापुआ न्यू गिनी देशाने जागतिक नेतृत्वासाठी सन्मानित केले आहे. या दोन्ही देशांनी त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान देऊन पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) गौरवले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (21 मे) जपानमधील G-7 आणि क्वाड बैठकीनंतर पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले. याठिकाणी त्यांनी फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स को-ऑपरेशन (FIPIC) च्या तिसऱ्या शिखर परिषदेला हजेरी लावली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी पॅसिफिक क्षेत्रातील अनेक देशांच्या नेत्यांची भेट घेऊन मैत्रीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. त्यामुळे पापुआ न्यू गिनी आणि फिजीच्या पंतप्रधानांनी जागतिक नेता म्हणून भारताच्या या पावलांसाठी पंतप्रधान मोदींना त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ प्रदान करून गौरव केला. आतापर्यंत जगातील काही गैर-फिजीयनांना हा सन्मान देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, रविवारी पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच APEC हाऊसमध्ये पोहोचले. याठिकाणी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी मोदींचे स्वागत केले आणि पॅसिफिक बेट राष्ट्राची एकता आणि ग्लोबल साउथच्या नेतृत्वासाठी पापुआ न्यू गिनीकडून देण्यात येणारा ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू’ देऊन मोदींना सन्मानित केले. तर, दुसरीकडे पॅसिफिक बेट देश प्रजासत्ताक पलाऊचे अध्यक्ष सुरंगेल एस. व्हीप्स ज्युनियर यांनी पंतप्रधान मोदींना ‘अबकाल’ पुरस्काराने सन्मानित केले. दोन्ही नेत्यांची ही भेट फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स को-ऑपरेशन शिखर परिषदेच्या ठिकाणी झाली.

‘थिरुक्कुरल’ या पुस्तकाच्या अनुवादाचे प्रकाशन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पापुआ न्यू गिनीमध्ये ‘थिरुक्कुरल’ या पुस्तकाच्या टोक पिसिन अनुवादाचे प्रकाशन केले. एफआयपीआयसी शिखर परिषदेच्या वेळी त्यांनी सोलोमन बेटांचे पंतप्रधान मनसेह सोगवारे यांचीही भेट घेतली.

नरेंद्र मोदींनी नेत्यांची भेट घेत विविध विषयांवर केली चर्चा
मोदींनी गव्हर्नर जनरल सर बॉब डेड यांचीही भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-पापुआ न्यू गिनी संबंधांमधील विकास भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी पापुआ न्यू गिनीमध्ये पंतप्रधान मोदींनी समोआचे पंतप्रधान फियामी नाओमी मटाफा यांच्याशी द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याच्या मार्गांवर चर्चा केली. त्यानंतर मोदींनी पॅसिफिक आयलंड फोरमचे (PIF) महासचिव हेन्री पुना यांची भेट घेतली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आज (22 मे) किरिबाती प्रजासत्ताकचे राष्ट्रपती तानेती मामाऊ यांच्याशी संवाद साधताना दोन्ही राष्ट्रांमधील संबंध वाढवण्याच्या उद्देशावर चर्चा केली. याशिवाय, पंतप्रधान मोदींनी मार्शल बेटांचे प्रजासत्ताक मंत्री किटलंग ​​काबुआ यांचीही भेट घेतली.

 

First Published on: May 22, 2023 3:25 PM
Exit mobile version